भाजपची अवस्था म्हणजे मला नाही अब्रू मी कशाला घाबरू! उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

शिवसेना पक्षप्रमुख दोन दिवसांच्या शिर्डी दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांचे सोनई येथे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. सोनईवासीयांनी केलेल्या स्वागतामुळे ठाकरे हे भारावून गेले होते. सोनईतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला, या आसुडाचे फटके भाजप आणि गद्दारांच्या पाठीवर बसले. त्यांनी आपल्या भाषणात काय म्हटले ते वाचा.

सोनईमधील सोन्यासारख्या मर्दमावळ्यांनो मी राज्यभर फिरतोय. मी खरंच भारावून गेलो आहे. सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी समजू शकतो मात्र ज्याच्याकडे पक्ष ठेवले नाही, चिन्ह ठेवले नाही, मी आता काही देऊ शकत नाही तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे.

मी एक गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आजही शंकरराव मंत्री असतेच. ते आज तिकडे गेले असते तरी ते मंत्री असते मात्र तुम्ही जे धाडस दाखवलंत त्याला म्हणतात निष्ठा. मला काही मिळो अथवा न मिळो , मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना मी दगा देणार नाही अशी भूमिका त्यांची असल्याने त्यांच्यावर जनता प्रेम करते.

परवापर्यंत अशोक चव्हाण आपल्याशी नीट बोलत होते, जागावाटपाची चर्चा करत होते, असे अचानक जातील असे वाटले नव्हते. आम्ही अशोक चव्हाणांवर आरोप केले नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चव्हाणांवर आरोप केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. या घोटाळ्याची आठवण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने पुन्हा झाली. भाजपही 400 पार बोलून बसलाय आणि घाबरलाय ..400 पार जाऊ दे ते 40 पारही नाही होणार. 400 पार आकड्यासाठी आता नितीश कुमारांना फोड, शहीद कुटुंबियांचा अपमान केलाय, डिलर बोललोय तरी अशोक चव्हाणांना घ्या असे चालले आहे. भाजपही घाबरून गेली आहे आणि अशोक चव्हाणही घाबरल्याचे म्हणतायत. दोघेही एकमेकांवर काय आरोप केलेत हे विसरून गेलेत. मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी यांची परिस्थिती आहे. अब्रूच राहिलेली नाही, त्याचे धिंडवडे उडालेले आहेत.

जे घाबरट लोक असतील त्यांनी त्या बेकड पक्षात जावं. अवकाळीचा पुन्हा तडाखा बसला आहे. आज अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर जायची जास्त गरज होती. मराठवाड्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. संकट आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अद्याप स्टेटमेंट आलेले नाही ‘त्वरीत पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत’ आता तुमच्याच कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे.

विदर्भात सरकारने हमीभाव दिला आहे आणि नियम केला आहे की हमीभावाच्या खाली खरेदी केली तर गुन्हा दाखल करू. मात्र तिथले दलाल अडल्या- नडल्या शेतकरी मदतीचे ढोंग करून पांढरे सोने आपल्या खिशात पाडतात आणि चढ्या भावाने विकतात. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शेतकऱ्याकडून ना हरकतप्रमाणपत्र लिहून घेतात. मग गुन्हा कसा दाखल करणार ?

मोदीजींना वाटत असेल की मोठमोठे नेते फोडले तर पाळीव जनावरांसारखी जनताही त्यांच्या पाठी जाईल. मात्र असं नाहीये मोदीजी. महाराष्ट्र संकटाच्या छाताडावर लाचून जाणारा महाराष्ट्र आहे. तुम्ही जे काही करत आहात ते पंतप्रधान म्हणून तुम्हाला शोभत नाही. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरातचे पंतप्रधान आहात.

हुकूमशाही महाराष्ट्राला बरबाद करायला निघाली आहे ती तुम्हाला पटते आहे का ? यांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे, मग दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी धडकलेले आहेत त्यांचे काय. या गोष्टी वाहिन्या दाखवणार नाही कारण त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही मात्र गद्दारांना खोकेच्या खोके मिळतायत. शेतकऱ्यांना पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही मात्र गद्दार तिथे गेले तर त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होतात, त्यांना राज्यसभाही मिळेल, खोकेही मिळतील आणि भ्रष्ट कारकीर्द धुतली जाईल.

भाजपचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते कट्टर आहेत. त्या निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावर असे भ्रष्ट उपरे बसवतायत. मग कशासाठी तुम्ही मेहनत केली? हेच तुमचं हिंदुत्व आहे का, हे हिंदुत्व भाजप आणि संघाच्या त्या निष्ठावंतांना मान्य आहे? तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व, तुम्ही म्हणाल ते देशप्रेम, तुम्ही म्हणाल तो देशद्रोही.. हे नाही मान्य करणार.

आपल्या उमेदवारासमोर भाजप आणि त्यांच्या भ्रष्ट साथीदारासमोर उमेदवार उभा करून दाखवावा म्हणजे तुम्हाला कळेल की निष्ठावंत तुम्हाला कसा पाणी पाजतो. कदाचित पंतप्रधानही इथे येतील. निवडणुका आल्यानंतर सबका साथ आणि निवडून आल्यानंतर मित्राचा विकास. त्यावेळी त्यांना शेतकरी दिसत नाही, त्यावेळी सुटाबुटातील मित्र पाहिजे असतात. शेतकरी फक्त निवडून देण्यापुरता पाहिजे. शेतकऱ्यांमुळे मोदी दिल्लीत पोहोचले, मात्र ज्यांच्यामुळे ते दिल्लीत पोहोचले त्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवले जात आहे. अशी लोकशाही आणि असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजे का? हे शेतकरी हक्काच्या राजधानीत मंत्र्यांना भेटायला जात आहे, मात्र त्यांच्यावर अश्रूधूर सोडला जातोय. . त्यांच्यावर अश्रूधूर कशाला सोडताय, शेतकरी माझा असाच रडतोय, त्याच्या डोळ्याला आधीच अश्रूधारा लागल्या आहेत.