हातात मशाल आहे; विजयाची तुतारी फुंकणारच – उद्धव ठाकरे

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवू अशी ग्वाही देतानाच, यंदा पहिल्यांदाच आपले मत काँग्रेसच्या हाताला असले तरी त्या हातात मशाल आहे आणि दोन्ही एकत्रित आल्यानंतर महाविकास आघाडी निश्चितच विजयाची तुतारी फुंकेल, असा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

देशात हुकूमशाही येता कामा नये, घटनेचे रक्षण झाले पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलता कामा नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडी एकजिनसीपणे लढतेय आणि जिंकणारच!

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पहिल्यांदाच हाताच्या पंजाला मत द्यावे लागणार असल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

वर्षाताई दक्षिण-मध्य मुंबईसाठी आग्रही होत्या, पण त्यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी दिली. यावर बोलताना, वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा असल्याने त्या कुठूनही लढू शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर-मध्य मुंबई हा माझा घरचा मतदारसंघ असल्याने माझेही मत वर्षाताईंना मिळणार, असे ते म्हणाले.

या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही? या प्रश्नावर, शिवसेनेने महायुतीशी आघाडी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या निर्णयाबद्दल बोलू शकत नाही, असे मिश्कील उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

घोसाळकर कुठेही गेलेले नाहीत

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाटय़ाला आला. मात्र अद्याप तिथे काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. तिथे काँग्रेसकडून विनोद घोसाळकरांचा विचार होतोय का? असा मुद्दा यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर जवळच उपस्थित शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्याकडे पाहत उद्धव ठाकरे म्हणाले की, घोसाळकर हे शिवसेनेतच आहेत, कुठेही गेले नाहीत.

सांगलीची जागा चांगली, आम्ही जिंकणारच!

सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार कालच काँग्रेसच्या मेळाव्यात सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्या अनुषंगाने तेथील बंडखोरीबाबत माध्यमांनी विचारले असता, सांगलीची जागा चांगली आहे आणि आम्ही ती जिंकणार, असे मिश्कील उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.

वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवणार

वर्षा गायकवाड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेयांनी शुभेच्छा दिल्या. वर्षाताईंना खासदार बनवून आम्ही दिल्लीत पाठवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. त्यासाठी वर्षा गायकवाड यांनी आभार मानले. तुमच्यासाठी नवखा मतदारसंघ आहे असे या वेळी माध्यमांनी वर्षा गायकवाड यांना विचारले. त्यावर गेल्या दहा महिन्यांपासून आपण या मतदारसंघात राहत असल्याने आपल्यासाठी हा मतदारसंघ नवा नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वासही या वेळी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

क्लीन चिट देता, मग घोटाळा झाला होता की नव्हता?

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली. त्याचा संदर्भ देत यावेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि भाजपवर टीका केली. 70 हजार कोटींचा घोटाळा, शिखर बँक घोटाळय़ाबाबत भाजपवाले ज्यांच्यावर आरोप करत होते ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट कशा मिळाल्या? असे लोक विचारताहेत. मग घोटाळा झाला होता की नव्हता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. नाना पटोले काल चांगलं बोलले. काही लोक चावीचे खेळणे आहेत, जशी चावी दिली जाईल तसे खेळतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर यावेळी केली.