अब की बार भाजप तडीपार; राजधानी दिल्लीतून उद्धव ठाकरे यांची गर्जना

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून देशात हुकूमशाही माजवणारे, अन्नदात्या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यास त्यांच्या मार्गात खिळे पेरणारे सरकार पुन्हा दिल्लीत येऊ देऊ नका, असे आवाहन तमाम देशवासीयांना करतानाच, अब की बार भाजप तडीपार, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून केली. त्याला विराट जनसागराकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन केले होते. त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपची अक्षरशः लक्तरे काढली. ही महारॅली निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण हिंदुस्थान सुनीता केजरीवाल, कल्पना सोरेन यांच्या पाठीशी

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्याचा उल्लेख करतच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि सोरेन यांच्या पत्नी कल्पना या आपल्या दोन बहिणी मोठय़ा हिमतीने लढताहेत, मग त्यांचे भाऊ म्हणून आम्ही कसे मागे राहू शकतो? त्यासाठीच आम्ही आलो आहोत, अशा भावना व्यक्त करतानाच, आमच्या बहिणींनी चिंता करू नये, संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी दिला. केजरीवाल, सोरेन यांच्यावर आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले, हे कसले सरकार, अशी चपराकही त्यांनी लगावली.

गावागावात भाजप तडीपारचा नारा द्या

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱया उत्तर हिंदुस्थानातील शेतकऱयांनी नवी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने रस्त्यांवर खिळे ठोकले होते. तसेच अश्रूधूर सोडला होता आणि लाठीमारही केला होता. त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी यावेळी देशातील शेतकऱयांना आवाहन केले. अन्नदाता शेतकऱयाला दिल्लीत येण्यापासून रोखणाऱया मोदी सरकारला पुन्हा दिल्लीत येऊ द्यायचे नाही अशी शपथ घेऊन पुढे व्हा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गावागावात जाऊन ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा द्या, असे ते म्हणाले.

आम्ही ठग नाही,भाजपवालेच भ्रष्ट, जुमलेबाज

इंडिया आघाडीच्या आजच्या मेळाव्याला भाजपाने ठगांचा मेळावा म्हटले होते. त्याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. माझे देशवासीय, देशप्रेमी नागरिक ठग आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. आम्ही ठग नाहीत तर भाजपचे लोकच भ्रष्ट आणि जुमलेबाज आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देश हुकूमशाहीकडे चाललाय ही शंका नव्हे, सत्य

देश हुकूमशाहीकडे चालला नाही ना अशी काही दिवसांपूर्वी फक्त शंका होती, पण आता ती शंका राहिली नाही तर ते सत्य आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. केजरीवाल आणि सोरेन यांना अटक केल्याने लोपं घाबरतील असे मोदी सरकारला वाटत असेल पण अद्याप त्यांनी देशवासीयांना ओळखलेले नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती घाबरणारा नाही तर लढणारा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भ्रष्टांना घेऊन भाजपा देशाचा विकास करू शकते का

भ्रष्टाचाऱयांना आपल्या पक्षात घेण्याच्या भाजपच्या धोरणावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सडकून टीका केली. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ धुऊन आपल्या व्यासपीठावर आणले, अशी टीका करतानाच, भ्रष्टांना घेऊन भाजपा देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते का, भ्रष्ट लोक देशाचा विकास करू शकतात का, असा सडेतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

एक व्यक्ती, एका पक्षाचे सरकार धोकादायक

भाजपचे आता 400 पारचे स्वप्न आहे, पण एक व्यक्ती, एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक ठरत आहे. आता हे चालणार नाही. सर्व राज्ये, सर्व प्रांतांचा सन्मान करणारे आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारे सरकार आणा, तरच देश वाचू शकतो, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी देशातील नागरिकांना केले. आपले भविष्य कोणाच्या हातात द्यायचे याचा विचार करा असे ते देशवासीयांना उद्देशून म्हणाले.