‘इंडिया’ची मुंबईतील बैठक देशाला दिशा देणारी ठरणार

भाजपच्या हुकूमशाही राजवटीविरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ऐक्याची वज्रमूठ उभारत ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून मोदी सरकारपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. या ‘इंडिया’ आघाडीची 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज ग्रॅण्ड हयातमध्ये उपस्थित राहून याबाबतचा आढावा घेतला. ‘इंडिया’ आघाडीची मुंबईतील ही बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

 देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ या नावाने एकत्र येत भाजपच्या नेतृत्वातील एनडीचा मुकाबला करण्याचा निर्धार करत ‘इंडिया जिंकणार, भाजप हरणार!’ असा ऐक्याचा बुलंद नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पाटणा, बंगळुरू येथील दोन बैठकांनंतर ‘इंडिया’ची महत्वपूर्ण बैठक मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला होत आहे. या बैठकीत सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्यादृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होऊन भविष्यातील धोरणे आणि कार्यक्रम ठरवला जाणार आहे.

‘इंडिया’ आघाडीची मुंबईत होणारी ही बैठक यशस्वी करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसचे मुंबई व राज्यातील नेते व पदाधिकारी महिनाभर नियोजन व तयारी करत आहेत. या तयारीचा आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष ‘इंडिया’ आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एकत्रित तसेच आपापल्या पक्षाच्या पातळीवर काम करत असल्याचे यावेळी दिसून आले.

या आढावा बैठकीस शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, अॅड. अनिल परब, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, कॉँग्रेसचे नेते नसिम खान, संजय निरुपम, मुंबई कॉँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, सतेज पाटील, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील आदी नेत्यांसह महाविकास आघाडचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘इंडिया’ भारत जितेगा

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीला सात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पॅबिनेट मंत्री यांच्यासह देशभरातील 26 राजकीय पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत.