अमेरिकेची बोईंग 737 मॅक्स विमानांच्या उत्पादनावर बंदी 

 

अमेरिकेच्या फेडरल विमान प्राधिकरणाने वादग्रस्त बोईंग 737 मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. त्याचा मोठा फटका हिंदुस्थानातील विमान कंपन्यांना बसणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस, स्पाईसजेट आणि अकासा एअरने बोईंगला 527 विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा दरवाजा अचानक उघडल्याची घटना तीन आठवडय़ांपूर्वी घडली होती. त्यानंतर वैमानिकाने विमान सुरक्षित लँडिंग केले होते. या घटनेनंतर बोईंगला आपल्या दर्जा नियंत्रण यंत्रणेच्या चौकशीचा सामना करावा लागला. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने अमेरिकेच्या फेडरल विमान प्राधिकरणाने उत्पादन बंद करण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या हवाई व्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱया फेडरल हवाई प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, बोईंग वादग्रस्त 737 मॅक्स विमानांच्या उत्पादनाचा विस्तार करू शकत नाही. कंपनीने या विमानातील सर्व त्रुटी दूर केल्या पाहिजेत. आम्ही उत्पादनाच्या विस्तारासाठी बोईंगच्या कोणत्याही विनंतीचा विचार करणार नाही असेही प्राधिकरणाने बजावले आहे. त्यामुळे बोईंग विमानाच्या पुरवठय़ावर परिणाम होणार आहे.