Lok Sabha Election 2024 : भाजपने तिकीट कापले; नाराज वरुण गांधी यांना काँग्रेसची ऑफर

Lok Sabha Election Politics :

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. पण यात वरुण गांधी यांना पीलीभीत मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली नाही. भाजपने पीलीभीतमधून उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री जितीन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे वरुण गांधी नाराज आहेत. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका करत वरुण गांधी यांना थेट ऑफर दिली आहे. यामुळे वरुण गांधी यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारल्यावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘वरुण गांधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. ते काँग्रेसमध्ये येत असतील तर आम्हाला आनंदच होईल. वरुण गांधी हे एक बडे आणि सक्षम नेते आहेत’, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले. ‘गांधी घराण्याशी संबंध असल्याने भाजपने वरुण गांधी यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे आता वरुण गांधी यांनी काँग्रेसमध्ये यावे’, असे चौधीर म्हणाले.

वरुण गांधी काय निर्णय घेणार?

आता वरुण गांधी यांची पुढील भूमिका काय असेल? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. वरुण गांधी हे अपक्ष निवडणूक लढणार अशीही चर्चा आहे. तर काँग्रेसकडून निवडणूक लढवा, असा सल्ला काहींनी त्यांना दिला आहे. सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. आता वरुण गांधी यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यात परतावे, असे मत अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त केले आहे. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांना ऑफर दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.

वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? ते काँग्रेसमध्ये जाणार की अपक्ष निवडणूक लढणार? अशी चर्चा होत असताना वरुण गांधी आता पीलीभीतमधून निवडणूक लढणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. ‘आपल्याला छळण्यात आले आहे. यामुळे निवडणूक लढणार नाही’, असे वरुण गांधी हे आपल्या निकटवर्तीयांना म्हणाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे वरुण गांधी यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांची आई मनेका गांधी यांना सुलतानपूर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. पण आता काँग्रेसमधून ऑफर आल्याने वरुण गांधी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.