‘जम्मू-कश्मीरची जिथे सुरुवात होते तिथे लोकशाही संपते’; ओमर अब्दुल्ला यांची तिखट प्रतिक्रिया

omar-abdullah

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं की, ‘जम्मू आणि कश्मीरमधील लोकांना इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांच्या विजयावर आनंद व्यक्त करण्यास फारसा वेळ नाही’.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विधानसभा निवडणुका जिंकल्याच्या नंतर जम्मू आणि कश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं आहे. तर काँग्रेसनं तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाला दणका दिला.

‘देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इतरांच्या विजयाबद्दल लोकांनी फारसा आनंद व्यक्त केला नाही. कारण जम्मू आणि कश्मीरमधील रहिवाशांनी कित्येक वर्षात निवडणुका पाहिलेल्या नाहीत’, असं उमर यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

ते म्हणाले की, ‘आम्ही फक्त इतर राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळी पाहू शकतो, पण इथे काही होऊ शकत नाही. जम्मू-कश्मीरची सुरुवात जिथे होते तिथे लोकशाही संपते’.

केंद्र सरकारवर टीका करताना नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष म्हणाले की, ‘जे लोक जगभरात लोकशाहीचा बिगुल फुंकतात, ते जम्मू-कश्मीरमध्ये लोकशाही येऊ देत नाहीत’.

‘त्यांनी दाखवून दिलं आहे की त्यांना केवळ विधानसभाच नाही तर पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा तिरस्कार आहे. ते जिल्हा विकास परिषदाही संपुष्टात आणतील यात आश्चर्य नाही’, असंही अब्दुल्ला म्हणाले.

‘जम्मू आणि कश्मीरच्या लोकांचा काय दोष आहे की त्यांना त्यांच्या लोकशाहीच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे आणि त्यांना विधानसभा (सदस्य) निवडण्याची संधी देखील दिली जात नाही?’, असा सवाल त्यांनी विचारलं.