कारागृहातील बंदींशी ‘व्हिडीओ कॉल’वर साधता येणार संवाद

कारागृहात अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात असून, आता बंदिजनांना नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. ती यंत्रणा यशस्वी झाल्याने सर्वच कारागृहांत याचा अवलंब केला जात आहे. तसे फलकही कारागृहाबाहेर लावण्यात आले आहेत. यामुळे आता कुटुंबीयांची जेलवारी थांबणार आहे. ‘एनपीआयपी’ या संकेतस्थळावर नावनोंदणी करून नातेवाईक, वकील यांना नोंदणी करता येणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कच्चे कैदी आहेत. बंदिजनांची भेट घेण्यासाठी दररोज नातेवाईकांची मोठी गर्दी कारागृहाबाहेर दिसून येते. बंदिजनांना नातेवाईकांशी बोलण्यासाठी इंटरकॉमची सुविधा आहे. नातेवाईकांना आठवडय़ातून एकदा बंदिजनाला भेटण्याची फोनवर बोलण्याची मुभा असते. मात्र, लांब राहणाऱ्या नातेवाईकाला सकाळी भेट घेण्यासाठी आदल्या दिवशी निघावे लागते. त्यामुळे नातेवाईकांचा वेळेसह आर्थिक खर्चही होतो. तसेच भेटीसाठी तासन्तास प्रतीक्षाही करावी लागते.

गेल्या काही महिन्यांपासून सांगली कारागृहात बंदींची संख्या वाढली असून, सद्यस्थितीत 373 बंदिजन आहेत. याचा ताण कारागृह प्रशासनावर असून, दैनंदिन मुलाखतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही वाढत आहे. नातेवाईकांची होणारी धावपळ आणि प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी आता ‘व्हिडीओ कॉलिंग’ची सुविधा सुरू केली आहे. अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या पुढाकारातून ही यंत्रणा सुरू करण्यात आली. आता सर्वच कारागृहांत ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी याबाबतचे फलकही कारागृह परिसरात लावले आहेत.

अशी आहे यंत्रणा

गुगलवर NPIP PORTAL असे टाईप केल्यानंतर संकेतस्थळ खुले होईल. मुलाखत घेणाऱ्यांना यावर नोंदणी करावी लागते. संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यावर व्हॉट्सऍप क्रमांक असलेला मोबाईल क्रमांक टाकला जातो. त्यानंतर ओळखपत्र अपलोड केले जाते. पूर्ण माहिती भरल्यानंतर दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येतो.