गुजराथी, कुंटे हिंदुस्थानी संघात

महाराष्ट्रातील नाशिकचा विदीत गुजराथी आणि पुण्यातील ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या बुद्धिबळ संघात निवड झाली आहे. विदीत खेळाडू, तर कुंटे प्रशिक्षक म्हणून हिंदुस्थानी संघाबरोबर जातील.

तब्बल 13 वर्षांनी बुद्धिबळाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2010 मध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला होता. हिंदुस्थान आणि चीन हे दोन संघ या क्रीडा प्रकारात बलवान मानले जात आहेत. विदीतसह पी. हरिकृष्णा,  आर. प्रग्यानंद, डी, गुकेश, अर्जुन एरिगसी असा भारतीय संघ आहे. विदीत आणि अर्जुन हे सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारांत खेळणार आहेत.

अभिजित कुंटे यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जागतिक सांघिक स्पर्धेत महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. महिला संघ वैयक्तिक जलद आणि सांघिक जलदगती प्रकारात सहभागी होणार आहे. कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका, वैशाली रमेशबाबू, सविता श्री. बी. आणि वंतिका अग्रवाल असा महिला संघ असेल. हम्पी आणि हरिका या वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत खेळणार आहे.

विदीत गुजराथी म्हणाला, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना खूप आनंद होत आहे. स्पर्धेचे स्वरूप मनोरंजक असून वयैक्तिक आणि सांघिक लढती खेळताना कौशल्य पणाला लागेल. कोलकता येथील शिबिरात चांगला सराव झाला आहे. सर्वच खेळाडूंना आता स्पर्धेत खेळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आमच्याकडून अपेक्षा मोठय़ा आहेत. पदक मिळविण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू.’