रशियात पाचव्यांदा पुतिनराज

व्लादिमीर पुतिन हे सलग पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 15 ते 17 मार्चदरम्यान झालेल्या मतदानात पुतिन यांना तब्बल 88 टक्के मते मिळाली. तर त्यांचे विरोधक निकोले खारितोनोव्ह यांना केवळ 4 टक्के मते मिळाली. पुतीन यांच्याविरोधात केवळ तीन उमेदवार होते. युक्रेन युद्धाचा विरोध करणाऱ्या कुणालाही पुतिन यांच्याविरोधात लढण्याची परवानगी नव्हती. 1999 पासून पुतिन रशियाचे नेतृत्व करत आहेत. पुतिन यांच्या विजयामुळे त्यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. पुतिन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवलानी यांचा गेल्या महिन्यात तुरुंगातच मृत्यू झाला होता.

तिसऱ्या महायुद्धाचा दिला इशारा
पुतिन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भविष्यात रशिया आणि नाटोमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करून तिसऱया महायुद्धाचा इशारा दिला. मला वाटते आधुनिक जगात काहीही होऊ शकते. परंतु, हे सगळे तिसऱया महायुद्धापासून एक पाऊल मागे असेल आणि मला नाही वाटत की यात कुणालाही रस असेल, असेही पुतिन म्हणाले.