नगर तालुक्यात 13 गावांना टँकरने पाणी

पावसाने पाठ फिरवल्याने नगर तालुक्यात पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यासारखीच स्थिती आहे. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, विहिरी, तलाव, बंधारे कोरडेठाक पडले आहेत. तालुक्यातील 13 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढते आहे. एकूणच नगर तालुका दुष्काळाच्या उंबरठय़ावर असून, बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे.

खरीप हंगामातील बाजरी, मूग, सोयाबीन पिकांची पावसाअभावी वाताहात झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने हुलकावणी दिल्याने मुगाच्या पेरणीत मोठी घट झाली होती. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या थोडय़ाफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत पिके हिरवी दिसत असली तरी पाण्यासाठी ताणल्याने उत्पन्नात घट होणार आहे, तर काही ठिकाणी पिके पावसाअभावी कोमेजून जात आहेत. एकूण खरीप हंगाम वाया जात आहे. लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असलेल्या तालुक्यात यंदा मात्र लाल कांदा दिसणार की नाही, याबाबत शंका आहे. लाल कांद्याची रोपं टाकण्यासाठी पाणी शिल्लक नसल्याने त्याचा परिणाम लाल कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे.

नगर तालुका पर्जन्यछायेचा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण चांगले राहिलेले आहे. मागील वर्षी तर अतिवृष्टीने हाहाकार घातला होता. तालुक्यात परतीचा मान्सून चांगल्या प्रमाणात कोसळतो. आता परतीच्या मान्सूनकडे शेतकरी आस लावून बसला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता चालूवर्षी वरूणराजाने निराशा केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

‘गर्भगिरी’च्या टेकडय़ांनाही पावसाची प्रतीक्षा

नगर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगररांगा आढळून येतात. यामध्ये औषधी वनस्पतींचा खजिना, तर विविध वन्यप्राणी, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार आढळतो. पावसाळ्यात हिरवाईने नटणाऱ्या गर्भगिरी डोंगर रांगांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. डोंगरगण, इमामपूर, आगडगाव, देवगाव, गुंडेगाव, गोरक्षनाथ गड ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजून जात असतात. यंदा मात्र पावसाअभावी सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

या गावांत सुरू आहेत टँकर

नगर तालुक्यातील मदडगाव, सांडवे, भोयरे पठार, दशमी गव्हाण, भोयरे खुर्द, बहिरवाडी, नारायण डोहो, माथणी /बाळेवाडी, उक्कडगाव, ससेवाडी, कोल्हेवाडी, इमामपूर, चिचोंडी पाटील या 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच इतर गावांतही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होणार आहे.

रब्बी हंगामावरही संकट

पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी हंगामावरदेखील दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. तालुक्यातील बहुतांशी भागांतील विहिरी, तलाव, बंधारे, कूपनलिका कोरडे पडले आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य तीक्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्याचप्रमाणे चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असून, पशुधन जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.