हिंदुस्थानची धक्कादायक सलामी, विंडीजचा 4 धावांनी सनसनाटी विजय

कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये दुबळ्या भासणाऱ्या वेस्ट इंडीजने टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात हिंदुस्थानला 4 धावांनी धक्का देत आपली ताकद दाखवली. वेस्ट इंडीजच्या 150 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा संघ 9 बाद 145 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि दोनशेव्या टी-20 सामन्यात हिंदुस्थानला अनपेक्षित हार सहन करावी लागली.

आज हिंदुस्थानच्या इशान किशन (6) आणि शुभमन गिल (3) या दोन्ही सलामीवीरांना 28 धावांत बाद करून विंडीजने सनसनाटी सुरुवात केली. मात्र त्यानंतर सूर्यकुमार (21), तिलक वर्मा (39), हार्दिक पंड्या (19) आणि संजू सॅमसन (12) यांनी धावा केल्या, पण फार मोठी मजल मारू शकले नाहीत. विजय हिंदुस्थानच्या आवाक्यात असूनही अक्षर पटेलनंतर फलंदाजच नसल्यामुळे हिंदुस्थानला 4 धावांनी पराभव सहन करावा लागला. ओबेड मकॉय, शेफर्ड आणि होल्डरने प्रत्येकी दोन विकेट घेत आपला संघ टी-20 कमकुवत नसल्याचे दाखवून दिले. सूर्या आणि हार्दिक पंडय़ाला बाद करणारा जेसन होल्डर सामनावीर ठरला.

 त्याआधी निकोलस पूरन (41) आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल (48) यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे वेस्ट इंडीजने 6 बाद 149 अशी आव्हानात्मक मजल मारली होती. नाणेफेक जिंकणाऱया वेस्ट इंडीजने फलंदाजी निर्णय घेतला, पण युजवेंद्र चहलने तीन चेंडूंत ब्रेंडन किंग आणि कायल मायर्स या दोन्ही सलामीवीरांना पायचीत करून विंडीजला जबर धक्का दिला. जॉन्सन चार्ल्सचा अडथळा कुलदीप यादवने दूर करत त्यांची 3 बाद 58 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर पूरन आणि पॉवेलने वेगवान फटकेबाजी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. पूरनने 34 धावांत 41 तर पॉवेलने 32 चेंडूंत 48 धावा ठोकल्या. या दोघांनी 5 षटकार आणि 5 चौकार लगावले. या फटक्यांमुळेच विंडीज 20 षटकांत 6 बाद 149 धावांपर्यंत पोहोचला. चहलने 24 धावांत तर अर्शदीप सिंगने 31 धावांत प्रत्येकी 2 विकेट टिपले.