अमित शहा ‘मातोश्री’वर लोटांगण घालायला आले तेव्हा घराणेशाही दिसली नाही काय? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

उद्धव ठाकरे म्हणजे घराणेशाही. एक व्यक्ती, एक घराणं पक्ष चालवू शकत नाही, असे म्हणता मग अमित शहा तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला आणि माझ्याशी बोलायला आला होतात ते का आला होता? ‘मातोश्री’ला लोटांगण घातले तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसली नाही का, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. शिवसेना हा शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यांचा पुत्र जनतेच्या आशीर्वादाने या पक्षाचा प्रमुख आहे. होय, आमची घराणेशाही तेव्हाही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुम्हाला कदाचित नसेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शहा यांना लगावला.
तुम्ही ‘मातोश्री’वर आलात आणि नंतर घात केला. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द मोडला. आमच्या पाठीत वार केला, असे नमूद करत, आमचे हिंदुत्व दुसऱया कुणाचा घात करणारे नाही. जर कोणी आमच्या पाठीत वार केला तर त्याचा कोथळा कसा काढायचा हे शिकवणारे हिंदुत्व आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याचा झंझावात आज कोकणात होता. रायगड लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या रत्नागिरीतील गुहागर आणि दापोली येथे दणदणीत जनसंवाद मेळावे झाले. या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी हजारो कोकणवासीयांच्या उपस्थितीत भाजप आणि गद्दारांवर कडाडून हल्ला केला. शिवसेना आणि कोकणचे अतूट नाते आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाते कायम जपले. कोकणवासीयांनीही शिवसेनेवर जिवापाड प्रेम केले आणि करत आहेत, अशी कृतज्ञता यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

भाजपची खरी संस्कृती बाहेर आली

गुहागरजवळ अलीकडेच भाजपची सभा झाली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नीलेश राणे यांचे पह्टो होते आणि त्यावर भाजपचे शीर्षस्थ नेते असे लिहिले होते. त्या सभेमध्ये नीलेश राणे यांनी असंस्कृत भाषेत भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती. त्याचा उल्लेख यावेळी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केला होता. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर शरसंधान केले. सध्या भाजपचे शीर्षासन सुरू असल्याने त्यांचे शीर्ष म्हणजे डोके खाली गेलेय आणि पाय वर आलेत, असे सांगतानाच, त्या हरामखोरांच्या असभ्य, असंस्कृत भाषेला अजिबात उत्तर देऊ नका, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव आणि शिवसैनिकांना केल्या. भाजपाची खरी संस्कृती आता बाहेर यायला लागली असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत अशा प्रकारच्या घाणेरडय़ा शिव्या आणि घाणेरडे प्रकार शिकवत असतील असे कधीच वाटले नव्हते, अशा शब्दांत त्यांनी भाजपचाही समाचार घेतला.

कोकणातले मासेही गुजरातला पळवताहेत

महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले, आता कोकणातील मासेही गुजरातला पळवले जात आहेत, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. गुजरातमधून एलईडी बोटी आणून कोकणात मासेमारी केली जातेय आणि इथले मासे गुजरातला पळवले जाताहेत, मग कोकणवासीयांनी काय करायचे, आम्हाला काय घंटा, म्हणजे राम मंदिर उभारलेय आता तुम्ही बसा घंटा वाजवत, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. तौत्ते आणि निसर्ग वादळाच्या आपत्तीत महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांना दिलेली मदत तसेच निवारा पेंद्रांची उभारणी व भूमिगत वीजवाहक तारांचा निर्णय याचेही दाखले यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

मोदींच्या टिनपाटांच्या तोंडी लागू नका

कोकणात मोदींची भोपं पडलेली टिनपाटे ज्या भाषेत शिवसेनेवर टीका करत आहेत तशी शिवसैनिक मोदींवर करणार नाहीत, कारण आम्ही हिंदू आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. या टिनपाटांच्या तोंडी लागू नका, ही कस्पटे आहेत, यांचे राजकीय जीवन भाजपवर अवलंबून आहे. भाजप जेव्हा त्यांना गेटआऊट म्हणेल तेव्हा टमरेल घेऊन बरोबर रांगेत उभे राहतील, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली.

लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय, तिला वाचवा

भाजपच्या मनमानीला लगाम घालणाऱया सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी काwतुक केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून एक विनंती केली. ते म्हणाले की, लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय. तिच्यात श्वास घेण्याची शक्ती राहिली आहे तोपर्यंत औषध देऊन तिला वाचवा. ती मेली तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?

यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, माजी पेंद्रिय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते, आम. अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, संजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, नगराध्यक्षा ममता मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर, दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवले, खेड तालुकाप्रमुख संदीप कांबळे, शहरप्रमुख संदीप चव्हाण उपस्थित होते.

कोकणातील गुंडागर्दीशी लढणारे भास्कर जाधव यांच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना

कोकण हे शिवसेनेच्या हक्काचे आहे. ठाकरे घराणे आणि कोकणवासियांचे नाते काय हे कोकणातील लोपंच सांगतील. भाजपवाल्यांनीही कोकणशी त्यांचे काय नाते आहे ते सांगावे, कोकणवासियांनी त्यांना स्वीकारले तर मी निघून जातो, असे आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. कोकणातील गुंडागर्दीशी बेधडकपणे लढणारे भास्कर जाधव यांच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना उभी आहे, असेही त्यांनी बजावले.

हिंदुस्थानचा चीन होईल अशी भीती वाटतेय

मोदींच्या राजवटीत हिंदुस्थानची वाटचाल चीनच्या दिशेने होत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, बीजिंगमधील ऑलिम्पिकच्या आधी आपले काही मित्र चीनला गेले होते. तिथे भाषेची बोंब असल्याने दुभाषी असल्याशिवाय कुणाशी बोलताच येत नाही. तिथे त्यांना अस्खलित इंग्रजी बोलणारा एक गाईड भेटला. त्यांनी त्याला ऑलिम्पिकच्या काळात बीजिंगमध्ये जा, तिथे जगभरातून लोक येतात, चांगले पैसे मिळतील असा सल्ला दिला. त्यावर मला जगायचेय, बीजिंगमध्ये एखादी व्यक्ती अनावधानाने जरी सरकारविरोधात बोलली की दोन दिवसांत बेपत्ता होते असे उत्तर त्याने दिले. आता तसाच प्रकार हिंदुस्थानात होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण इथे सरकारविरुद्ध बोलले तर धाडी पडतात, तुरुंगात टाकले जाते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महायुतीच्या सभेला माणसे भाडय़ाने आणायला लागतात – अनंत गीते

महायुतीच्या सभांना आणि कार्यक्रमांना सरकारी कर्मचाऱयांना सक्तीने बोलावले जाते. कार्यक्रम असला की एमआयडीसीला सुट्टी दिली जाते. भाडय़ाने माणसे आणली जातात. आज इथे जमलेली सर्व माणसे निष्ठsने आली आहेत, असे गीते म्हणाले. पन्नास खोके एकदम ओकेची घोषणा झाली. आता हे पन्नास खोके या निवडणुकीत संपणार आहेत. असे सांगताना त्यांनी उपस्थित सर्वांना शपथ दिली.

भ्रष्टाचारी अभय योजना हीच मोदींची गॅरेंटी

पंतप्रधान जन-धन योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान अमुक योजना, तमुक योजना आहेत तशीच भारतीय जनता पक्षाची भ्रष्टाचारी अभय योजना आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांनी भाजपात यावे अशी ही मोदी गॅरेंटी आहे, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. आता शिमगा येतोय…तो नुसता बोंबलून नको तर हुकूमशाहीची होळी करून साजरा करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी शिवसेनेची लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे… पार विल्हेवाट आहे. कोणताही उमेदवार द्या, त्याला 100 टक्के निवडून आणू असे शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी सांगताहेत. त्यामुळेच भाजपवाल्यांना घाम फुटलाय.
भाजपच्या इडय़ा बिडय़ा जे काही असेल त्या बिडीचे बंडल करून टाकू. शिवसैनिकांना त्रास देणाऱया अधिकाऱयांना सांगतोय. उद्या आमची सत्ता आल्यानंतर त्यांना कायद्याचे फटके दिल्याशिवाय राहणार नाही.