दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची ओडिशात पुनरावृत्ती, प्रेयसीचे 31 तुकडे करून जंगलात फेकले.

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची ओडिशामध्ये पुनरावृत्ती झाली. विवाहित पुरुषावर प्रेम करण्याची किंमत एका तरुणीला जीव गमावून चुकवावी लागली आहे. प्रियकराने आधी तिला प्रेमाच्या बाहुपाशात गुंतवले आणि नंतर तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार नबरंगपूर जिल्ह्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी 22 वर्षांची होती. आदिवासी समाजाची ही तरुणी बुधवारी घरातून निघून गेली. अनेक तास उलटून गेल्यावरही ती घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. मात्र आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर पोलिसात त्यांनी तक्रार दाखल केली.

पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर रायघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य सेन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. या दरम्यान बरंगपूर जिल्ह्यातील जंगलातून छिन्नविछिन्न आणि तुकडे केलेला मृतदेह आढळून आला. चौकशीदरम्यान सदर मृतदेह हरवलेल्या तरुणीचाच असल्याचे सिद्ध झाले. मृतदेहाचे 31 तुकडे करण्यात आले होते आणि त्यावर ओषध मारण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आले. मयत तरुणी हिचे एका विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. पाच मुलं असलेल्या या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केली होती. तरुणी वारंवार लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती.

बुधवारीही ती प्रियकराच्या घरी पोहोचली आणि लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकू लागली. त्यामुळे तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी प्रियकराने पत्नीच्या मदतीने तिची हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली. तसेच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरेल, असे पोलिसांनी सांगितले.