पाकिस्तानचा गोंधळ संपेना, वर्ल्ड कपचा संघ जाहीर करण्यात आशियाई संघ मागे

वर्ल्ड कपचा पहिला चेंडू पडायला आता केवळ दोन आठवडे उरलेत. आशियातील पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ वगळता अन्य सात संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. मात्र तिन्ही आशियाई संघांच्या मागे लागलेले दुखापतींचे ग्रहण सुटता सुटत नसल्यामुळे त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याचा गोंधळही संपण्याची चिन्हे दिसत नाही.

येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वर्ल्ड कपचा तेरावा क्रिकेट सोहळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील लढतीने सुरू होतोय. या स्पर्धेसाठी आशिया खंडाबाहेरील इंग्लंड, नेदरलॅण्ड्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाचही संघांनी आपले 15 सदस्यीय संघ जाहीर करून एक आठवडय़ापेक्षा अधिक काळ उलटला आहे. तसेच हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान या आशियाई संघांनीही आपली नावे जाहीर केली आहेत. मात्र नुकतीच आशिया चषक स्पर्धा खेळूनही पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना आपले संघ जाहीर करता आलेले नाही.

श्रीलंका आणि बांगलादेशही अडचणीत

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील काही खेळाडू जखमी असल्यामुळे त्यांनाही संघ जाहीर करण्यात विलंब होत आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचे चक्क पाच खेळाडू अनफिट होते. परिणामतः त्यांना हिंदुस्थानी संघाविरुद्ध संघर्षही करता आला नाही. त्यामुळे श्रीलंकन संघ आयसीसीच्या डेडलाइनच्या आधीच संघ जाहीर करेल. तसेच बांगलादेशचा संघ आता न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळतोय, पण त्यांच्या संघातही काही बदल अपेक्षित आहेत. संघाचे नेतृत्व शाकिब अल हसनच्या हातात राहिल की दुसऱया कुणाच्या हाती संघाचे कर्णधारपद असेल. याबाबत अद्यापही कसलीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच चार महिन्यांपूर्वी तडकाफडकी निवृत्ती पत्करणारा तमीम इक्बाल संघात असेल की नाही याबाबतही कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र बांगलादेश संघात अनुभवी खेळाडूंनाच अधिक आजमावणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणते अनुभवी खेळाडू पुन्हा संघात आलेले असतील, ते संघ जाहीर झाल्यावरच कळू शकेल.

काहींचे पत्ते कापले जाणार

आशिया चषकादरम्यानच पाकिस्तानच्या नसीम शाह आणि हारिस रऊफला दुखापत झाली होती. रऊफची दुखापत सौम्य असली तरी नसीमला काही काळ संघाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कप मुकण्याचीच अधिक शक्यता आहे. तसेच आशिया चषकातील अपयशामुळे भरकटलेल्या पाकिस्तानी संघासाठी 15 खेळाडूंची निवड करताना पीसीबीचाही गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे अंतिम संघ जाहीर करताना काही खेळाडूंचे पत्ते कापले जाण्याची शक्यता आहे तर एक किंवा दोन अनपेक्षित नावेही संघात असतील, असे सूत्रांकडून कळले आहे.

पाकिस्तानचा संभाव्य संघ

बाबर आझम (कर्णधार), इमाम उल हक, अब्दुल्ला शफिक, सलमान अली आगा, अहमद, सऊद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाझ-इमाद वसीम, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ, हसन अली आणि झमान खान.