ऐश्वर्या रायवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर अब्दुल रज्जाकने मागितली माफी

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्या त्या विधानावरुन नेटकरी संतापले होते. चहूबाजूने टीका झाल्यानंतर त्याने ऐश्वर्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागितली आहे. अब्दुल रझाक म्हणाला, पत्रकार परिषदेत क्रिकेटबाबत बोलत होतो आणि माझी जीभ घसरली. तोंडातून ऐश्वर्या यांचे नाव आले. मी त्यासाठी माफी मागतो असा व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.

विश्वचषक-2023 मध्ये पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर पत्रकार परिषदेत बोलताना, रझाक याने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर टीका केली आणि पीसीबीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याने ऐश्वर्याला टीकेमध्ये ओढले. म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की, ऐश्वर्या राय सोबत लग्न केल्याने चांगली आणि चांगली मुले जन्माला येतील, तर तसे कधीच होणार नाही. म्हणून, आपण प्रथम आपले हेतू निश्चित करायला हवा अशी गरळ ओकली होती.

विश्वचषक-2023 मध्ये पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी तो म्हणाला, ”कर्णधार म्हणून युनूस खानचा हेतू चांगला होता आणि त्यामुळे मला चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला. इथे प्रत्येकजण पाकिस्तानच्या संघाच्या हेतूबद्दल बोलत आहे. वास्तविक, पाकिस्तानमध्ये खेळाडू विकसित करण्याचा आणि त्यांचे स्किल पॉलिश करण्याचा कोणाचाच हेतू नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, ऐश्वर्या रायशी लग्न करून एक चांगला आणि गुणी मुलगा जन्माला येईल, तर असे कधीच होणार नाही”, असं रझाक म्हणाला होता. विशेष म्हणजे तो माध्यमांशी बोलत असताना तिथे त्याचे जुने सहकारी शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल त्याच्यासोबत होते. त्यांनी त्याच्या टीकेला थांबवले नाही किंवा त्याचा निषेधही केला नाही त्याच्या कमेण्टला आनंद घेत टाळ्याही वाजवल्या.