हिलाळ मळ्यात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, पायाला व छातीला गंभीर जखमा

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या हिलाळ मळ्यात मंगळवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान उसाला पाणी भरीत असलेल्या तरुण शेतकऱ्यावर जवळच दडी मारून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या घटनेत या तरुण शेतकऱ्याच्या छातीस व पायास बिबट्याचे दात,नख्या लागल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या परमेश्वर दत्तात्रय बोटकर (21) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

उसाला पाणी भरीत असलेल्या परमेश्वरवर बिबट्याने हल्ला करताच त्याने बिबट्याचा प्रतिकार करीत जखमी अवस्थेत आरडा ओरडा केल्याने बिबट्या तेथून पसार झाला. घटनेची माहिती परिसरात समजताच जखमी परमेश्वर ला तात्काळ जांबुत येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. हा तरुण शेतकरी उपचार करून घरी आला असून प्रकृती सुधारत आहे. दरम्यान वन विभागाचे वनपाल नारायण राठोड,वनकर्मचारी हनुमंत कारकूड,सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, अविनाश पोकळे, किसन हिलाळ, अतुल हिलाळ, सावकार शेटे, दत्तात्रय बोटकर यांनी घटनास्थळी व जखमी परमेश्वर ची भेट घेत त्याच्या सह कुटुंबाला दिलासा दिला.

दरम्यान या घटने बाबत शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना विचारले असता सदर जखमी शेतकऱ्यास आजच प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असून जोपर्यंत तो तरुण व्यवस्थित बरा होत नाही तो पर्यंत तो पर्यंत तो शिरूर वन विभागाच्या देखरेखी खाली राहील. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या शेतकऱ्याचा उपचाराचा झालेला खर्च शासन नियमाप्रमाणे देण्यात येईल. हिलाळ मळ्यात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने दिवसाचं हल्ला करीत गंभीर जखमी केल्याने परिसरात खळबळ उडाली असून आता दिवसाही शेतकऱ्यांनी शेतात काम कसे करायचे ? असा सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.