नगर जिल्ह्यात 29 लाख टन ऊसाचे गाळप; सुमारे 24 लाख पोत्यांचे उत्पादन

प्रातिनिधिक फोटो

नगर जिल्ह्यामध्ये यंदा उसाचे प्रमाण घटल्याने गाळपासाठी उस मिळेल की नाही अशी शंका उपस्थित होत होती. तर काही तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 29 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यातील 11 सहकारी व 3 खासगी अशा 14 कारखान्यांनी 17 डिसेंबरपर्यंत 28 लाख 85 हजार 966 टन उसाचे गाळप करून त्यापासून 24 लाख 23 हजार 435 पोती साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा दैनंदिन साखर उतारा 14.89 टक्के मिळाला आहे. त्यात अंबालिका (जगदंबा) या खासगी कारखान्याने सर्वांत जास्त चार लाख टन उसाचे गाळप केले आहे.

काही प्रमाणात थंडी जाणवू लागल्यामुळे उसाचा उतारा वाढला आहे. अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा व्यक्त झाल्यामुळे आगामी काळात शेतातील ऊस तोडून आणण्याच्या समस्या होणार आहे. ऊसतोडणी कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याने साखर कारखान्यांपुढे असलेला ऊस तोडायचा कसा हे प्रश्न निर्माण झाले आहेत. पीयूष, साईकृपा, प्रसाद, ढसाळ अ‍ॅग्रो, जय गजानन युटेक या पाच कारखान्यांची अद्ययावत गाळपाची आकडेवारी मिळू शकली नाही. केंद्र शासनाने उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी. हेवी मोलॅसेसपासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती अंशतः उठविल्यामुळे इथेनॉल निर्मिती करणार्‍या जिल्ह्यातील 11 कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इथेनॉल निर्मितीतून मिळणार्‍या आर्थिक लाभातून शेतकर्‍यांना एफआरपीचा चांगला लाभ मिळण्याची आशा आहे. केंद्र शासनाने आठ दिवसांपूर्वी इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. सामान्यांना साखर जादा दराने घ्यावी लागू नये म्हणूनच केंद्र शासन सातत्याने काळजी घेत आहे.