‘कश्‍मीरचे नशीब गाझासारखेच असेल तर…’: पुंछ हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांच्या विधानावरून वाद

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू आणि कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी मंगळवारी सांगितलं की, जर हिंदुस्थान आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे वाद संपवले नाहीत तर कश्मीरचे गाझा आणि पॅलेस्टाईनसारखेच भविष्य होईल ज्यावर बॉम्बहल्ला होत आहे. अब्दुल्ला यांनी पूंछमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता ज्यात हिंदुस्थानच्या लष्कराचे चार जवान ठार झाले आणि इतर जखमी झाले. त्यानंतर झालेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला.

‘जर संवादातून तोडगा निघाला नाही तर, गाझा आणि पॅलेस्टाईनवर इस्त्रायलकडून बॉम्बफेक होत असलेल्या देशांप्रमाणेच आम्हालाही सामोरे जावे लागेल’, असं ते म्हणाले.

अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं की, ‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की आपण आपले मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण राहिलो तर दोघांचीही प्रगती होईल. आता युद्ध हा पर्याय नाही आणि हे प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत’, असंही ते म्हणाले.

त्यांनी विचारले, ‘संवाद कुठे आहे? नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत, आणि ते हिंदुस्थानशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. हिंदुस्थान चर्चेसाठी तयार नसण्याचे कारण काय?’, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सोमवारी जम्मू-कश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांना भेट दिली आणि स्थानिक सैनिकांना दहशतवाद्यांकडून लपण्याचे ठिकाण म्हणून वापरल्या जाणार्‍या गुहा (गुप्त जागा) उद्ध्वस्त करण्यास सांगितले. परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.

दरम्यान, राजौरी-पुंछमधील हवाई निरीक्षण आणि कोम्बिंग ऑपरेशन्स सरू असून सलग चौथ्या दिवशी मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितलं की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी राजौरी-पुंछ सेक्टरला भेट देतील आणि आंतरराष्ट्रीय सीमा भागात कर्तव्यावर असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील आणि या भागातील नागरिकांची भेट घेतील.