ठाणे पालिका आयुक्त बांगर यांची उचलबांगडी; निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगाने मिंधे सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही आज उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नवी मुंबई महापालिकेत दोन वर्षे आणि ठाणे महापालिकेत दीड वर्ष असा आयुक्तपदाचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.

बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यानंतर 2022 साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली होती. बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात दोन वेळा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱया बांगर यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केली नाही.

या नावांची चर्चा
ठाणे महापालिका आयुक्तपदी कोण येणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. आयुक्तपदासाठी डॉ. सुधाकर शिंदे, पी. वेलरासू आणि सौरभ राव तसेच अभिषेक राऊत आणि रुबल अग्रवाल यांच्या नावाची चर्चा असून यामध्ये पी. वेलरासू आणि अभिषेक राऊत यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

राज्य सरकारने दुर्लक्ष केले
एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणाऱया जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या बदल्या करण्याचे आदेश पेंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते, परंतु त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले होते. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास येताच आयोगाने दणका देत बांगर यांच्या बदलीचे आदेश दिले.