उमरखेड येथील डॉक्टरच्या खून प्रकरणातील आरोपीला अटक; दोन वर्षांपासून होता फरार

>> प्रसाद नायगावकर

सुमारे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून डॉक्टर हणमंत धर्मकारे या डॉक्टरची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. अटक होण्याच्या भीतीने या प्रकरणातील आरोपी अमजद खान सरदार खान हा फरार झाला होता. आता दोन वर्षांनंतर या आरोपीला गावठी पिस्तूलसह अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर हणमंत धर्मकारे हे उमरखेड येथील कुटीर रुग्णालयात कार्यरत होते. आरोपी अमजद खान सरदार खान याच्या भावाचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्याच्या भावाचा मृत्यू झाला. याचा राग मनात ठेवत अमजद आणि त्याच्या साथीदारांनी डॉक्टरांनी धर्मकारे यांच्यावर गोळीबार करून त्यांची निघृण हत्या केली. पोलिसांनी उमरखेड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला होता.

या घटनेनंतर अमजदच्या साथीदारांना अटक करण्यात आली. मात्र, तेव्हापासून अमजद अटकेच्या भीतीने फरार होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अमजदकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. ती जप्त करण्यात आली आहेत.

अमजद हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेचे आयएमएचे राज्याचे पूर्व अध्यक्ष डॉक्टर टी. सी. राठोड यांनी स्वागत केले आहे. अमजदला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , आधारसिंग सोनोने आदींनी बजावली.