उर्मिलाचा ‘बुक क्लब’

अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूटय़ूबर उर्मिला निंबाळकरने ‘बुक क्लब विथ उर्मिला’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. हॉलीवूडमधील रिस विदरस्पून ही अभिनेत्री तिच्या आयुष्यात तिला भावलेल्या पुस्तकांवर व्हिडीओ करते. तिची ही ‘बुक क्लब’ संकल्पना उर्मिलाला फार आवडली. उर्मिला सांगते, ‘‘आपल्याकडे जसे विविध चित्रपट महोत्सव होतात तसेच विदेशात ‘बुक क्लब’ फेस्टिव्हल्स होतात.

आपल्याकडेही अनेक ठिकाणी ‘बुक कॅफे’ सुरू झाली आहेत. जिथे चहा, कॉफीसोबत मनमुराद वाचन करत बसू शकता. विदेशात हे प्रमाण अधिक आहे. जगभरातील अनेक यूटय़ूब चॅनेल्स माझ्या पाहण्यात आले. त्यातून प्रेरणा घेऊनच मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून ‘बुक क्लब विथ उर्मिला’ ही संकल्पना सुरू केली आहे. पहिल्या व्हिडीओपासूनच रसिकांची कमाल दाद मिळत असून रसिकांची आवड पाहून ग्रंथांची, पुस्तकांची, ‘ऑडिओ बुक्स’ची निवड करणे हे मोठे आव्हान असल्याचे ती सांगते.

‘स्टोरीटेल’मुळे मला कमीत कमी एखादं ‘ऑडिओ बुक’ महिन्याला ऐकता येते. मी ऐकलेल्या ‘ऑडिओ बुक’वर व्हिडीओ करता येतो. त्यामुळे वर्षातून किमान 12 ‘ऑडिओ बुक्स’ ऐकण्याचा मी संकल्प केला आहे,’’ असे उर्मिलाने सांगितले.