वाकेन पण मोडणार नाही! मिध्यांचा उलटा कारभार; स्टार प्रचारकांच्या यादीवरून अंबादास दानवेंची सडकून टीका

शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे जनतेसमोर कोणत्या तोंडाने जायचे अशा विवंचनेत असलेल्या मिंधे गटाने आता निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रचारक उसने घेतले आहेत. भाजपने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यानंतर तीच यादी मिंधे गटाने कॉपी पेस्ट करून फिरवली. यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.

Ambadas Danve यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मिंधे गटाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीचा फोटो शेअर केला आहे. यातील बहुतांश प्रचारक भाजपचे आहेत. वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. एक्स (ट्विटर) या अकाऊंटवरून त्यांनी मिंधे गटावर निशाणा साधला.

“बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहामध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत 25 टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो.. यांचा कारभार उलटा आहे.. वाकेन पण मोडणार नाही!”, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला.

दरम्यान, भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, रामदास आठवले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यातील मंत्री अशा 40 जणांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही त्यात आहेत. मिंध्यांची स्टार प्रचारकांची यादीही काही वेगळी नाही. त्यातही पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा समावेश आहे. मिंध्यांनी भाजपची यादी कॉपी पेस्ट केली असली तरी त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेला संताप पाहता भाजपचे स्टार प्रचारक मिंध्यांच्या व्यासपीठावर येतील की नाही याबद्दल शंकाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिंध्यांची यादी कॉपी पेस्ट… भाजपच्या प्रचारकांची उसनवारी