मुद्दा – कोकणातील वृक्षतोड आणि चिरेखाणी

>> शिरीष बने

कोकणात नेहमीच वृक्षतोड होत असते. जंगलेच्या जंगले व्यापारांना दिली जातात. राजरोसपणे हा व्यवसाय चालू असतो, परंतु कोणीही सरकारी अधिकारी लक्ष देत नाही. चिरेखाणी तर कोकणातील कातळ फोडून संपूर्ण जमिनीचे व्यवस्थापन बिघडवीत आहे. यामुळे जनतेला त्रास होत आहे, परंतु ना खंत सरकारी यंत्रणेला ना तलाठी महाशयांना, ना तालुक्याच्या तहसीलदारांना. सर्व आलबेल! वृक्षतोड व चिरेखाण हा कोकणातील फारच मोठा प्रश्न असून  त्याकडे लक्ष न देता सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून या दोन्ही गोष्टींकडे पर्यावरणाचा ऱ्हास करणारी मंडळी पाहत आहेत. हे खरोखर कोकणचे दुर्दैव आहे!

कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये  वृक्षतोड करणे व चिरेखाणी खोदणे सर्रासपणे चालू आहे. गरीब जनतेला फसवून सर्व व्यवहार नियमित चालू असतो. या विषयावर पारदर्शकता आणून त्यावर टाच आणावी. रत्नागिरी तालुका हा 127 गावांचा असावा. प्रत्येक गावामध्ये शेती त्याचबरोबर भातशेती, नाचणी, वरीसाठी वरकस जमीन व जांभा दगडाचा माळ पठारासारखा कातळ अशी तेथील वस्तुस्थिती आहे. 30-40 वर्षांपूर्वी बरीचशी मंडळी हा शेती व्यवसाय करत होती. झाडेमाडे सांभाळत होती व मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्थिरस्थावर होण्याकरिता मुंबईला पाठवत होती.  सुशिक्षित झाल्यावर मुलंही आई-वडिलांना मुंबईला नेत होती. त्यामुळे गावची घरं बंद पडू लागली. त्यामुळे गावच्या जागा, जमिनी अनेक एजंट सर्व लक्षात घेऊन जागा जमीन विकायला लागले. हे योग्य नाही.

कोकणातील रत्नागिरी तालुका म्हणजे निसर्गाने बरसात केलेला पर्यावरणाने निगडित असणारा. झाडाझुडपांनी, फळांनी व्यापलेला हा  समृद्ध प्रदेश वरील काही घटनांमुळे परप्रांतीयांना विकला जात आहे. रत्नागिरी तालुक्यातील चिरेखाणी हा  मोठा विषय आहे. कवडीमोल  किमतीने गरीबांचा जांभा दगडाचा कातळ विकत घेणारे व तेथे चिरेखाणी खोदणारे दलाल भरपूर निर्माण झालेले आहेत.  या निर्मळ कातळावर दिसणारा जांभा दगडाचा पठार आज चिरेखाणीमुळे विकृत झाला आहे. मोठय़ा विवरासारखे खोदकाम करून तो भाग अत्यंत विवस्त्र करून जेथे हे घडत आहे त्या गावचे विद्रूपीकरण होत आहे ही नक्कीच खेदाची गोष्ट आहे.

विशेष म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावे अशी आहेत की, या चिरेखाणीमुळे गावाची वेस, गावाची सीमा दिसेनाशी झाली आहे. श्री क्षेत्र स्वामी स्वरूपानंद स्वामी यांच्या पावस गावापासून ते निरूळ, बोरभाटले, साकूचे तळे, पुढे चांदोर आगवे व पुढे अनेक गावांची लांजापर्यंत या चिरेखाणीने दिशा बदलली आहे. निरूळ फाटा येथील चिरेखाणीने तो परिसर एवढा विद्रूपीकरण करून ठेवला आहे की, तेथे 70-80 फुटांच्या चिरेखाणी असून जीवघेण्या ठरल्या आहेत हे सत्य आहे. गरीबाला अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी जागा, जमिनी विकाव्या लागतात, पण कुठेतरी बंधन येणे महत्त्वाचे आहे. कारण यावर जर बंधन नसेल तर हा जांभ्या दगडांचा कातळ नेस्तनाबूत करण्याकरिता परप्रांतीय प्रत्येक गावावर आपले वर्चस्व दाखवून गरीबाला देशोधडीला लावतील. सरकारी यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे आणि कातळ सुफलाम करावा.