लेख – जंगलाबाहेरील बिबटय़ांची संख्याः धोक्याची घंटा

>> रोहन भाटे

जंगलाबाहेरील बिबटय़ांची संख्या कराड, पाटण तालुक्यात जास्त आहे. शासन दरबारी वन्य जीव विभागाकडून चार वेळा नित्यनेमाने वन्य जीव गणना व्याघ्र प्रकल्पात राबवली जाते. व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रपमध्येही त्यांची संख्या समजते, पण याउलट स्थिती प्रादेशिक वन विभागातील प्रादेशिक विभागाच्या ताब्यातील जंगलात मनुष्यवस्तीत आहे. तेथे असे नियोजनबद्ध वार्षिक कार्यक्रम हाती घेतला जात नाही. शासनाने यासंदर्भात हालचाल करायला पाहिजे. भविष्यात जंगलाबाहेरील बिबटय़ांची संख्या मोठा प्रश्न बनू शकतो.

कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी, शेडगेवाडी, पाली येथील साखर कारखान्यांमुळे उसाची झालेली प्रचंड लागवड, उसाने बिबटय़ाच्या सर्व गरजा भागवल्या आहेत. आज जवळपास दोन दशके बिबटय़ाचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे. बिबटय़ाच्या जवळपास तीन ते चार पिढय़ा उसाच्या शेतात जन्माला आल्या आहेत. त्यांच्या मेंदूत जनुकीय बदल झाले आहेत.  बिबटय़ा नरमादीने आपल्या जन्माला येणाऱ्या पिलांना हे उसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून  गर्भात बिंबवले आहे. हा एक जनुकीय बदल आहे. बिबटय़ांना जेरबंद करून वन विभागाने अभयारण्यात, जंगलात पुन्हा सोडलेही, पण त्या बिबटय़ांना जंगल हे आपले घर माहीत नाही. ते उसाचेच रान म्हणजे आपली सुरक्षित घर मानतात व पुन्हा या उसातच येतात. बिबटय़ा हा प्राणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो हे या प्राण्याचे वैशिष्टय़ आहे.

बिबटय़ांचे वास्तव्य जंगलाबरोबरच जंगल परिसरातील गावांच्या आसपास तसेच बागायती ऊस शेती क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. बिबटय़ा खरं तर माणसांच्या वस्तीच्या आजूबाजूला वावर बिनधास्त करतात. बिबटय़ा हा चोरटा शिकारी आहे. जंगलात हरीण, भेकर, माकड, वानर, छोटी रानडुकरे, साळिंदर, ससा अशी शिकार करतो, तर जंगलाबाहेर शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबडय़ा, मोर, इतर शिकार करतो.

जंगलाबाहेरील बिबटय़ांची संख्या कराड, पाटण तालुक्यात जास्त आहे. शासन दरबारी वन्य जीव विभागाकडून चार वेळा नित्यनेमाने वन्य जीव गणना व्याघ्र प्रकल्पात राबवली जाते. व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रपमध्येही त्यांची संख्या समजते, पण याउलट स्थिती प्रादेशिक वन विभागातील प्रादेशिक विभागाच्या ताब्यातील जंगलात व मनुष्यवस्तीत आहे. तेथे असे नियोजनबद्ध वार्षिक कार्यक्रम हाती घेतला जात नाही. त्यामुळे आज अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची संख्या गणली जाते. त्यांची संख्याच साधारण माहीत असते. एक ठोकताळा वन्य जीव विभागाकडे आहे, पण हा अभाव प्रादेशिक वन विभागाकडे आहे. शासनाने यासंदर्भात हालचाल करायला पाहिजे. भविष्यात जंगलाबाहेरील बिबटय़ांची संख्या मोठा प्रश्न बनू शकतो आणि मानव बिबटय़ा संघर्ष निर्माण करू शकतो. जुन्नरसारखी परिस्थिती कराड, पाटण तालुक्यात निर्माण होऊ शकते. या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी नाही.

महाराष्ट्रात जुन्नरखालोखाल सर्वात जास्त बिबटय़ांची संख्या सातारा जिह्यात कराड व पाटण तालुक्यांत आहे. जवळ जवळ 39 नवीन गावे आहेत, जेथे बिबटय़ा व काही ठिकाणी मादी बिबटय़ा पिलांसह आपले अस्तित्व वारंवार दाखवत आहे. 2001 – 2002 मध्ये पुणे-जुन्नर वन विभागात जवळपास 11 लोकांचा बळी गेला. 25 हून अधिक लोक बिबटय़ांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाले होते.  बिबटय़ा व मानव संघर्ष विषय प्रसारमाध्यमाने उचलून धरला. दबावाला बळी पडत जुन्नर विभागाने 103 बिबटय़ांना पकडून एक रेकॉर्ड केले. त्याची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली. एका अधिकाऱ्याला शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले.  काही बिबटय़ांना माणिकडोह बिबट निवारण केंद्र व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त करण्यात आले. जवळपास 16 बिबटे हे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. जुन्नरमधील प्रश्न सुटला असे काही तज्ञांनी जाहीर केले, पण चांदोलीमधील सोडलेले काही बिबटे हे पुन्हा जुन्नरपर्यंत गेले हे एका अभ्यासात सिद्ध झाले. मांजर कुळात जन्मजात स्वगृही परतण्याची एक ओढ असते. त्या पकडलेल्या बिबटय़ांच्या शेपटीमध्ये एक विशिष्ट प्रकारची मायक्रोचिप त्यांना सोडण्यापूर्वी लावलेली होती. ते पुन्हा काही वर्षांनी जुन्नर भागात धुमाकूळ घालताना पिंजऱ्यात सापडले. शेपटीमधील मायक्रोचिपमुळे ते सिद्ध झाले. काही बिबटे सह्याद्रीमध्ये स्थिरावले. काही आजूबाजूच्या बफरमध्ये स्थिरावले, परंतु आता कराड तालुक्यात बिबटय़ांची संख्या वाढलेली आहे. झपाटय़ाने वाढत आहे.

विपुल अन्नपाणी, दिवसरात्रीसाठी उत्तम निवारा, प्रजनन, पिलांचे संगोपन, पिल्लांची सुरक्षितता यासाठी सुरक्षित जागा प्राण्यांच्या गरजा आहेत.  कृष्णा, सह्याद्री,अजिंक्यतारा, मरळी रयत, पाली या कराड व पाटण परिसरात असलेल्या साखर कारखान्यांमुळे उसाच्या मोठय़ा प्रमाणात लागवडीखाली असलेले क्षेत्र आहे. हे या बिबटय़ांचे मोठे निवारा केंद्र आहे. कृष्णा – कोयना नदीमुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे, विपुल प्रमाणात खाद्य आहे. ही कोणत्याही वन्य प्राण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते.

केंद्र शासनाने सर्व ग्राम पंचायतींना  जैवविविधता नोंदवही पीबीआर अनिवार्य केले आहे. ते जर अभ्यासपूर्ण झाले असेल तर, नोंदी जर अचूक केल्या असतील तर कराड, पाटण तालुक्यांतील नेमकी बिबटय़ांची संख्या समजू शकेल. पिलांना माणसापासून कसे टाळायचे याचे कौशल्य मादी स्वतः आत्मसात करीत आहे. आता पिलांनाही शिकवत आहे. ऊसतोड सुरू झाली की, सातत्याने स्थलांतर करावे लागते. हा काळ मादी व पिलांसाठी एक संघर्ष असतो. त्यादरम्यान अनेक वेळा माणसांशी संघर्ष होतो. पिले मोठी होत असताना साधारणतः जन्माला आलेल्या पैकी 50 टक्के  जगतात, मोठी  होतात. आपले स्वतंत्र क्षेत्र निश्चित करतात.

वन विभागाने वाढत्या बिबटय़ांच्या संख्येसाठी निश्चित धोरण ठरविले पाहिजे. त्याची नितांत गरज आहे. राज्यात पुणे, साताराबरोबर नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, बीड, धाराशीव जिह्यांत ऊस शेतीमध्ये तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रत्नागिरीमध्ये आंबा, काजू भागामध्ये  बिबटय़ांचा प्रश्न निर्माण झाला आहे.  बिबटय़ांची नसबंदी कार्यक्रम कराड, पाटण तालुक्यात व राज्यात बिबटेप्रवण क्षेत्रात राबविला पाहिजे. लोकांना बिबटय़ासोबत कसे राहायचे याचे प्रबोधन सातारा जिह्यात होणे गरजेचे आहे. बिबटय़ा प्रबोधन युनिट तयार झाले पाहिजे. आपण बिबटय़ासोबत राहू शकतो हे सामान्य लोकांना समजावले पाहिजे. लोकांच्यात तो विश्वास वन विभागाने निर्माण करणे गरजेचे आहे.

(मानद वन्य जीवरक्षक तथा सदस्य, वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरो)

 शब्दांकनः गोरख तावरे