कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची सुटका होणार

कुख्यात गँगस्टर अरूण गवळी याची मुदतपूर्व सुटका सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. पुढील महिन्यात अरुण गवळी उर्फ डॅडी याची सुटका होणार आहे. 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे शिक्षेतून सूट देण्यात यावी अशी मागणी गवळी याने केली होती. त्या संदर्भातच नागपूर खंडपीठाने हे निर्देश दिले असून कारागृह प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठाने अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे आदेश दिले. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरूण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

अरुण गवळी याने ज्या शासननिर्णयाच्या आधारे सुटकेची विनंती केली होती, त्या शासननिर्णयात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची अर्धी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देण्याची आणि त्यांना मुक्त करण्याची तरतूद नोंदवण्यात आली आहे. त्या आधारेच गवळी यालाही शिक्षेत सूट देत त्याच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत.