औराद शहाजानी येथे भुकंपाचा धक्का, 2.6 तिव्रतेचा धक्का बसला

मागील आठवड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यात भुकंपाचे धक्के जाणवले असतानाच आज पुन्हा लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे दुपारी 12:15 वाजता 2.6 तिव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली. तसेच औराद परीसरात मोठा अचानक आवाज झाल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील औराद येथे दिनांक 27 रोजी दुपारी अचानक 11:50 वाजता मोठा आवाज झाला व जवळपास दोन सेकंद जमीन हादरली. त्यामुळे औरादसह, तगरखेडा व सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील वांजरखेडा या गावातील लोकांची धावपळ उडाली. तेव्हा भुकंपाचा सौम्य धक्का असल्याचे काही नागरीकांनी वर्तविले पण निलंगा महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार तो भूकंप नसल्याचे अगोदर सांगण्यात आले. पण नंतर भूकंप नोंदणी विभागाच्या वतीने अजयकुमार वर्मा यांना संपर्क साधला असता त्यांनी लातूर जिल्ह्यात औराद परीसरात दुपारी 12.15 वाजता 2.6 तिव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात आले.

औराद येथे भूकंप झाल्याचे कळताच महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. पण सुदैवाने कुठेही नुकसान झालेली दिसून आले नाही किंवा कळलेले नाही. अचानक झालेल्या या आवाजाने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना लवकर करण्यात याव्यात, अशी मागणी जनतेच्या माध्यमातून होत आहे.