ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कप चॅम्प आयपीएलमध्ये फ्लॉप

ऑस्ट्रेलियाला जगज्जेते मिळवून देणाऱ्या खेळाडूंची आयपीएलमध्ये अक्षरशः चांदी झाली होती. मिचेल स्टार्कला तर कोलकाता नाईट रायडर्सने चक्क 24.57 कोटींना खरेदी करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच वर्ल्ड कप स्टार्सना मोठी किंमत लाभली होती. मात्र एखादा अपवाद वगळता हे स्टार्स आयपीएलच्या रणांगणात सपशेल फेल ठरले आहेत. त्याचा थेट फटका सर्व संघांना बसला आहे.

गेल्या वर्षी हिंदुस्थानात आयोजित केलेला वर्ल्ड कप जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आयपीएलमध्ये मागणी वाढली होती. त्यामुळे आयपीएलचा लिलाव होताच जगज्जेत्या खेळाडूंना आपल्या संघात खेचण्यासाठी सर्वच संघांनी मोठी किंमत मोजली होती. यात स्टार्कसह डेव्हिड वॉर्नर, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, ट्रव्हिस हेड, मार्कस स्टॉयनीस, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड यांचा समावेश आहे.

आयपीएल आपल्या अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचला असला तरी एखाद्या ऑस्ट्रेलियन्सला आपल्या लौकिकानुसार खेळ दाखवता आलेला नाही. स्टार्कला त्याच्या अचूकतेसाठी ओळखले जाते, पण हा महागडा खेळाडू कोलकात्यासाठी खूपच महाग ठरतोय. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलने तर घोर निराशा केली आहे. त्याचे तीन शून्य पाहून त्याला पुन्हा संधी मिळेल की नाही, याबाबतही शंका आहे. अशीच स्थिती सर्वच खेळाडूंची आहे. डेव्हिड वॉर्नरला आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज मानले जाते. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याला खेळायचे आहे, पण तो या आयपीएलमध्ये एकही मोठी खेळी करू शकलेला नाही.

नऊ संघांत ऑस्ट्रेलियन्स खेळाडू
यंदाच्या आयपीएलमध्ये एक चेन्नई सोडला तर उर्वरित सर्व संघांत 17 ऑस्ट्रेलियन्स खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाला जगज्जेतेपद मिळवून देणाऱया कमिन्सकडे हैदराबादचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्स हा असा संघ आहे ज्यात मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, झाय रिचर्डसन आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे चार ऑस्ट्रेलियन्स खेळत आहेत.

कमिन्स आणि हेडने लाज राखलीय
हैदराबादचे नेतृत्व करत असलेल्या पॅट कमिन्स आणि ट्रव्हिस हेडने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची लाज राखली आहे. वर्ल्ड कपला आपल्या शतकी खेळीने जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या हेडने आज बंगळुरूविरुद्ध 39 चेंडूंत शतकी खेळी करत आपल्या बॅटीचा दणका दिला आहे. तसेच पॅट कमिन्सने प्रत्येक सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करताना विकेट टिपल्या आहेत. तसेच जेक-मॅकगर्कने आपल्या आयपीएल पदार्पणातच अर्धशतकी झंझावात दाखवत अवघ्या क्रिकेटविश्वाला आपली ओळख करून दिली आहे.