देणाऱ्याने देत जावे…

सुदैवाने माझ्या जन्मापासून अशा माणसांच्या सहवासात आयुष्य गेलंय की, फारच अपवादाने निराशा, निरुत्साह अनुभवण्याची वेळ आली. संस्कारक्षम बालपण, ठाम नीतिमूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच आपल्या परंपरा, संस्कृती जपण्याचे संस्कार घरातूनच झाले… सांगत्येय अभिनेत्री लतिका सावंत.

सुरुवात अगदी माझ्या आई-बाबांपासूनच करते. भरपूर गोतावळा असलेलं आमचं टिपिकल मालवणी कुटुंब. लहानपणी अचानक आलेल्या पाहुण्यारावळ्यांचं अगदी मनापासून आनंदाने करणारी माझी आई व्रतवैकल्यं यांच्या सोबतच आमच्या शिक्षणाबाबतीतही अत्यंत आग्रही असलेली. बाबा तर जगन्मित्र. स्वतः तीन-तीन शिफ्टमध्ये डय़ुटी करूनही अडल्यानडल्यांना मदत करणारे.

बी पॉझिटिव्ह, मोठय़ांचा आदर करावा, आपल्यापेक्षा लहानांना समजून घ्यावं, गरजवंताला मदत करावी असं बसून कोणी शिकवलं नाही, परंतु मोठय़ांच्या वर्तणुकीतून आपोआपच ते झिरपलं गेलं. उत्तम गाणं ऐकण्याचे संस्कार झाले ते मोठा भाऊ भाईमुळे. स्वयंशिस्त अंगी बाणली गेली ती माझ्या तीनही भावंडांमुळेच. माझ्या जडणघडणीत चेतना महाविद्यालय आणि इथे भेटलेली गोड माणसं यांचा खूप प्रभाव माझ्यावर आहे.

किशोर कदम, गणेश यादव यांच्यासारखे गुरू मला इथेच लाभले. वाचनाचे संस्कार माझ्यावर झाले ते किशोर सरांमुळेच! महाविद्यालयीन काळात एकांकिका बसवण्यादरम्यान जे काही नाटय़संस्कार घडले त्याच ऐवजावर अजूनही पुढचा प्रवास चालू आहे.

माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘ऑल द बेस्ट’, ज्याचा प्रत्येक प्रयोग ही वेगळी कार्यशाळा असायची. महाराष्ट्रातल्या तसेच भोवतालच्या राज्यांमध्ये जिथे जिथे मराठी नाटक पाहिलं जातं, तिथे तिथे प्रयोग करण्याची संधी या नाटकामुळे मला मिळाली. प्रवासाची गोडी मला इथेच लागली.

नाटकात अभिनय करतानाच नारदीय कीर्तन हा प्रकार मला सोलो परफॉर्मन्ससारखा वाटला आणि म्हणून मी दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेत प्रवेश घेतला. एक अभिनेत्री म्हणून सलग दोन तास उभं राहून कीर्तनाच्या माध्यमातून नाटय़गृहातील प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मला लाभली ती केवळ माझ्या आजूबाजूच्या या अत्यंत सकारात्मक माणसांमुळेच. अभिनयाबरोबरच लिखाणाच्या माझ्या प्रवासात प्रसिद्ध लेखक प्रताप गंगावणे यांचं मार्गदर्शन लाभलं. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे लिखाण हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. जगदंब क्रिएशन्स, डॉक्टर अमोल कोल्हे आणि प्रताप सर यांनी दाखवलेला विश्वास मला मोठी ऊर्जा देऊन गेला.

अनेक संकटांवर मात करून सातशे बहात्तर भागांच्या या मालिकेने अनेक उच्चांक गाठले. पहिल्या भागापासून मला या मालिकेचा अत्यंत महत्त्वाचा भाग होण्याचं भाग्य लाभलं. छत्रपती संभाजी महाराजांची दुधाई, धाराऊ गाडे पाटील यांची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. या भूमिकेने मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम तर दिलंच, परंतु त्याचबरोबर प्रचंड ऊर्जा, सकारात्मकता दिली.

सकारात्मक असणं म्हणजे सहज असणं, स्वाभाविक असणं. सकारात्मक असणं म्हणजे शोध सुरू ठेवणं, स्वतःचाच. हा आजवरचा प्रवास सुखद, सुंदर आणि आनंददायी झाला तो केवळ आयुष्यातल्या उत्तम माणसांमुळेच. असं म्हणतात, आपल्या पदरात जे पडतं त्यातलाच थोडासा भाग आपण इतरांना वाटत असतो. मला आजवर भरपूर प्रेम, सकारात्मकता आणि कौतुकच लाभलं. त्यामुळे समोरच्याला देण्यासाठीदेखील माझ्याकडे तेच आहे.

संकलन : निनाद पाटील