केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

भाजपच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात जनतेमध्ये प्रचंड चीड असून त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवाराला आला. मुजफ्फरच्या जागेवरून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळालेल्या पेंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान यांच्या ताफ्यावर रात्री लोकांनी दगडफेक केली. अनेक गाडय़ांच्या काचा फुटल्या. हल्ला पूर्वनियोजित होता. त्यात आपला जीवही जाऊ शकत होता, असा आरोप बलियान यांनी केला आहे.

रात्री रस्त्यावरील सर्व दिवे मालवून ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा दावा बालियान यांनी केला आहे. हल्लेखोर तरुणवर्गातील असून त्यांचे आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा कांगावा डॉ. संजीव बालियान यांनी केला. मात्र, ज्यांनी कुणीही हे राजकीय षड्यंत्र रचले त्यांचा चेहरा पोलिसांनी समोर आणावा, अशी मागणीही बालियान यांनी केली आहे. मढकरीमपूर गावात एका कार्यक्रमासाठी बालियान जात होते. मंत्र्यांच्या स्वागतानंतर विक्रम सैनी यांचे भाषण सुरू होताच नागरिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच काही तरुणांनी डॉ. बालियान यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.