चारा छावणीच्या पैशांबाबत नाहटा दोषी आढळल्यास कारवाई करणार, सभापती अतुल लोखंडे यांची माहिती

दुष्काळामुळे शेतकरी जनांवरांसह चारा छावणीत दाखल होत आहेत.

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे 2013-14 श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी चारा छावणीप्रकरणी दोन कोटी 80 लाख रुपये चेकद्वारे काढले. मात्र, लेखापरीक्षण झाल्यानंतर अहवालामध्ये नाहटा यांनी हे पैसे चारा छावणीसाठी खर्च केल्याचे दिसले नाही. त्यामुळे लेखापरीक्षण अधिकाऱयांनी बाळासाहेब (प्रवीणकुमार) बन्सीलाल नाहटा यांच्यावर कारवाई करण्याचे सुचविले होते. मात्र, आज अखेर कारवाई झाली नाही. दरम्यान, पुन्हा 15 वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करून जर नाहटा दोषी आढळ्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना सभापती लोखंडे म्हणाले, बाजार समिती माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत आहे. गतवर्षी बाजार समितीला 2 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामधून 86 लाख रुपये नफा मिळाला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून इतका नफा कधीच मिळाल्याचे रेकॉर्ड नाही. या अगोदर बाजार समितीमध्ये नागवडे व पाचपुते याचे कार्यकर्ते पदाधिकारी होते. या पदाधिकाऱयांनी भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले होते. त्यांचे कुकर्म लपविण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मी जर भ्रष्टाचार केला असता तर उत्पन्न वाढलेले दिसले नसते.

विरोधकांच्या काळात 40 लाख रुपयांचे बांधकाम केले आहे. त्याची बिले सापडत नाहीत. याबद्दलही आम्हाला शंका आहेत. तसेच एक विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचा निधी वापरण्यात आला. मात्र, ती विहीर शोधण्याचे काम सुरू आहे. अजूनही विहीर सापडलेली नाही. विरोधक सांगतात, आम्ही मानधन घेतेले नाही. मात्र, मानधन न घेता कोटय़वधी रुपये काढता येतात आणि काढले आहेत, असा आरोप अतुल लोखंडे यांनी विरोधकांवर केला आहे. याचा जनतेसमोर लवकरच भंडाफोड करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस योगेश मगर, संदीप रोडे उपस्थित होते.

1016-17 च्या कामकाजाचीही चौकशी करणार

z सन 2016-17 साली सभापती असणारे धनंजय भोईटे यांचे विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन सह्यांचे अधिकार काढून घेतले; परंतु सहकार नियमानुसार व कायद्यानुसार सह्या काढून घेण्याची कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. त्यांच्यावर अन्याय करत सह्यांचे अधिकार काढून घेऊन ते उपसभापती वैभव पाचपुते यांना दिले. त्यांनी या काळात केलेले कामकाज अनधिकृत असून, त्याचीही चौकशी करणार असल्याचे सभापती लोखंडे यांनी सांगितले.