संकलित मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकात बदल

पीएटीअंतर्गत तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी 2 आणि पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा 2 ते 4 एप्रिलदरम्यान होणार होती, मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने या वेळापत्रकात बदल केला असून आता ही परीक्षा 4 ते 6 एप्रिलदरम्यान होणार आहे. तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमांत ही चाचणी घेण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरून या चाचणी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत. तिसरी, चौथी, सहावी आणि सातवीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करण्यात येणार आहे. तसेच पाचवी आणि आठवीसाठी शिक्षकांनी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करायच्या असून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात घेण्यात येणार आहे. तसेच पीएटीअंतर्गत पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा तसेच संकलित मूल्यमापन चाचणी या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेण्याचे बंधनकारक असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी स्पष्ट केले.

सुधारित वेळापत्रक

4 एप्रिल प्रथम भाषा (सर्व माध्यम) तिसरी/चौथी – वेळ सकाळी 8.00 ते 9.30.

5 एप्रिलगणित (सर्व माध्यम) पाचवी/सहावी – वेळ सकाळी 8.00 ते 9.45.

6 एप्रिल इंग्रजी सातवी/आठवी – वेळ सकाळी 8.00 ते 10.00.