न्यायालयात साक्षीसाठी आला अन् जाताना तीन घरफोड्या करुन गेला

महाराष्ट्रासह गुजरात राज्यात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार नाशिक येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. तेथून पुढे शहरात येऊन एकाच दिवशी तीन घरफोड्या करून गेला. या घरफोडीत लाखोचे ऐवज लंपास करणारा चोरटा रोहित ऊर्फ अरहान चेतन शेट्टी याच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. 29 घरफोड्या करणाऱ्या या चोरट्याकडून तब्बल 13 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबईतील दिवागाव येथील रोहित ऊर्फ अरहान शेट्टी हा सराईत घरफोड्या असून, त्याने मुंबईत तब्बल 28 घरफोड्या केल्या आहेत. त्यातच गुजरातमधील सूरत येथे देखील घरफोडी करून लाखोंचे ऐवज लंपास केला होता. हा सराईत गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातील न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. साक्ष दिल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर शहरात आला. या ठिकाणी आल्यानंतर त्याने एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत घरफोड्या करीत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. गारखेडा परिसरातील रोहिणी नाईक यांच्या पसायदान अपार्टमेंटमध्ये फ्लॅटचा दरवाजा तोडून 1 लाख 83 हजार 824 रुपयांचे दागिणे घेऊन पसार झाला. संकल्प अपार्टमेंट, गारखेडा परिसर येथील वर्षा बालाजी फ्लॅट फोडून 90 कोंढेकर यांचा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. नागरेश्वरवाडील सुलोचना अपार्टमेंटमधील ऋषिकेश गायकवाड यांचे घर फोडून 2 लाख रुपयांची रोकड, 5 लाख 2 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.

या प्रकरणी गुन्हा या तिन्ही भागांत दाखल होताच झालेल्या चोरीत साम्य असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणातील चोरटा रोहित शेट्टी हा मुंबईत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, पोलीस हवलदार संजय मुळे, प्रकाश गायकवाड, नवनाथ खांडेकर, बाळू लहरे, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, सुनील बेलकर, श्याम आढे, दादासाहेब झारगड, नितीन देशमुख व तातेराव शिनगारे यांच्या पथकाने मुंबईतून चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तब्बल 13 लाख 85 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.