गिफ्टच्या नावाखाली महिलेच्या बँक खात्यावर डल्ला

ऑनलाइन साईटवर ओळख झाल्यावर गिफ्टच्या नावाखाली ईडी चौकशी आणि केस युनायडेट नेशन विभागात गेल्याची भीती दाखवून ठगाने महिलेची 4 लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पार्क साईड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार महिला या विक्रोळी परिसरात राहतात. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ठगाने आपण आपले जुने मित्र शोधत आहोत. तेव्हा तुमचा आयडी दिसला. त्यानंतर महिलेने आपण ओळखत नाही असे त्याला सांगितले. तरीदेखील तो ठग महिलेला वारंवार मेसेज करत होता. ठगाने महिलेकडे तिचा नंबर मागितला. तेव्हा महिलेने तिचा नंबर शेअर केला. ठगाने सुरुवातीला कुटुंबीयांची माहिती विचारून वाढदिवस कधी असतो अशी विचारणा केली.

चर्चे दरम्यान त्याने आपले पंजाब येथे नातेवाईक आजारी असून त्याच्या उपचारासाठी 25 हजार रुपयांची गरज असल्याचे महिलेला सांगितले. तेव्हा महिलेने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी ठगाने महिलेला मेसेज करून पैशाची व्यवस्था झाली असल्याच्या भूलथापा मारल्या. दहा दिवसांपूर्वी त्याने महिलेला एक पह्टो मेसेज केला. गिफ्ट पाठवत असल्याचे त्याने महिलेला भासवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेला एका नंबरवरून पह्न आला. आपण दिल्ली विमानतळावरून बोलत असून तुमचे पार्सल आले आहे. त्या पार्सल साठी कस्टमची फी भरावी लागेल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला काही पैसे महिलेने ऑनलाइन ट्रान्स्फर केले. त्यानंतर ठगाने महिलेकडे आणखी पैशाची मागणी केली. त्या कुरिअरच्या बॉक्समध्ये परदेशी चलन आहे. त्या बॉक्सवर मनी लॉण्डरिंग  सर्फिफिकेट लागणार असल्याचे त्याने भासवले. जर ते प्रमाणपत्र लागले तर तुमची ईडी चौकशी होईल अशी भीती दाखवली.

भीतीपोटी महिलेने पैसे एका खात्यात भरले. पैसे भरल्यावर अंजू नावाच्या महिलेने तिला पुन्हा पह्न केला. तुमची केस युनायडेट नेशनच्या विभागात गेली आहे. ते त्या गिफ्टचा तपास करत आहेत. जर आता काही रक्कम भरली ते पार्सल तुम्हाला मिळेल असे सांगून आणखी पैसे भरण्यास ती भाग पाडत होती. गिफ्टच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पार्क साईड पोलीस ठाण्यात धाव घेतली