शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली होतेय फसवणूक, भरघोस परताव्याचे प्रलोभन महागात पडतेय

सध्या ‘शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ अशी जाहिरातबाजी करून नागरिकांना आकर्षक प्रलोभने दाखवली जात आहेत. जास्तीत जास्त पैसे गुंतविण्यास भाग पाडून पद्धतशीर लोकांची आर्थिक फसवणक केली जात आहे. त्यामुळे शेअर ट्रेडिंगच्या जाहिरातींना भुलून गुंतवणूक करण्याच्या भानगडीत कोणी पडू नका, सतर्क रहा आणि सायबर भामटय़ांचे मनसुबे उधळून लावा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाने मोठय़ा प्रमाणात नागरिकांची फसवणुक केली जात आहे. आकर्षक व भरघोस परताव्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले जात आहे. पैसे गुंतवल्यावर सुरुवातीला चांगला परतावा दिला जातो. त्यामुळे नागरिकांचा शेअर ट्रेडिंगमध्ये विश्वास बसतो आणि झटपट भरपूर पैसा मिळतो म्हणत नागरिक स्किममध्ये कुठलीही खातरजमा न करता पैसे गुंतवतात. मग मोठय़ा प्रमाणात पैसे गुंतवल्यावर सायबर भामटे पद्धतशीर फसवणूक करून पसार होतात. सद्यस्थितीत शेअर ट्रेडिंगच्या नावाने मोठय़ा प्रमाणात फसवणूक केली जित असल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. सायबर आरोपी वेगवेगळय़ा शकला लढवून नागरिकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे कुठेही पैसे गुंतवू नका, नको त्या जाहिरातींना बळी पडू नका, आवश्यक खातरजमा केल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू शका, असा सतर्कतेचा इशारा मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ प्रसारित करून नागरिकांना दिला आहे.