इतिहासाची मोडतोड करून खोटारडी विधाने करू नका! मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

मुख्यमंत्री या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असूनही इतिहासाची मोडतोड करून खोटारडी विधाने केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. जाहीर भाषणांमध्ये शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

ही नोटीस सौरभ ठाकरे पाटील आणि तेजस बैस यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे यांनी पाठवली आहे. या नोटिसीनुसार, मुख्यमंत्री या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असूनही शिंदे यांनी अनेकदा प्रक्षोभक, बेताल, खोटारडी आणि दिशाभूल करणारी जाहीर विधाने केली आहेत. इतिहासकालीन थोर व्यक्तींबाबत तसंच सणांविषयी संदर्भहीन माहिती शिंदे यांनी जाहीरपणे आपल्या विधानांमधून केली आहेत, असा आरोप या नोटिसीत करण्यात आला आहे.

या नोटिसीत शिंदे यांच्या दसऱ्या दिवशी झालेल्या बीकेसी येथील सभेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी महादजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढले आणि शहीद झाले असं विधान केलं होतं. हे विधान चुकीचे आणि इतिहासाचा विपर्यास करणारं आहे. कारण, या छत्रपती शिवाजी महाराज आणि महादजी व दत्ताजी शिंदे या तिन्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या काळात फरक आहे. त्यामुळे हे विधान इतिहासाची अक्षम्य मोडतोड आहे, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.

तसंच, 9 एप्रिल रोजी ठाणे येथील गुढीपाडवा कार्यक्रमात शिंदे यांनी केलेल्या भाषणावरही या नोटीसीत आक्षेप घेण्यात आला आहे. प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त हा सण साजरा करतो आणि संपूर्ण देशभर हा सण उत्सवात साजरा होतो, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. मात्र हे विधान अत्यंत हास्यास्पद आहे. कारण, प्रभू श्रीरामाचा रावणावरील विजय हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जात असताना गुढी पाडव्याला दसऱ्याचं नाव दिल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एक पक्ष फोडून त्यावर मालकी स्थापन करताना आणि हिंदुत्व हा शब्द सातत्याने वापरणाऱ्या व्यक्तिला हिंदू सणांची साधी माहिती असू नये हे खेदजनक असल्याचं म्हणत शिंदे यांनी सात दिवसांत दोन्ही चुकांसाठी जाहीर माफी मागत लेखी माफीनामा पाठवावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.