मद्य घोटाळा प्रकरणी आप नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स

आम आदमी पार्टीचे नेते दुर्गेश पाठक यांना कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने समन्स पाठवलं आहे. त्यानंतर पाठक हे सोमवारी दुपारी 2 वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, याच प्रकरणी अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. यापूर्वीही या दोघांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं.

या दरम्यान, आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या निवडणुकीत आपला प्रचार करता येऊ नये म्हणून भाजपने षडयंत्र रचत आहे. ईडी आणि भाजपची ही राजकीय युती आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत आपला प्रचार करण्यापासून रोखू इच्छित आहे, अशी टीका आतिशी यांनी केली आहे.

मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा दुर्गेश पाठक यांच्याकडे वळवला आहे. दुर्गेश पाठक हे दिल्लीच्या राजिंदर नगरचे आपचे आमदार आहेत. ते आपच्या स्थापनेपासून या पक्षात सहभागी झाले होते.