फेअरनेस क्रीम लावताय… सावधान!

गोऱया त्वचेबद्दल आपल्या समाजात असलेले आकर्षण नेहमीच चर्चेचा विषय ठरते. गोरी त्वचा हवी या मानसिकतेतून आपल्याकडे फेअरनेस क्रीमची मोठी बाजारपेठ आहे. फेअरनेस क्रीम लावल्यामुळे तुम्ही गोरे व्हाल याची गॅरंटी नसली तरी किडनीसंबंधी आजार होण्याची शक्यता मात्र आहे. हिंदुस्थानात या क्रीममध्ये पारा (मक्युरी ) जास्त असल्याने किडनीला हानी पोहोचते, असा धक्कादायक निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे.

हिंदुस्थानात फेअरनेस क्रीमचा वापर जास्त होतो. कोणत्याही वयाच्या व्यक्ती, महिला व पुरुष या क्रीमचा वापर करतात. मात्र त्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष दिले जात नाही. गोऱया होण्याच्या क्रीममध्ये उच्च पारा घटक असल्याने मेम्ब्रेनेस नेफ्रोथॅपीची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे किडनी फिल्टरचे नुकसान होते. प्रथिने गळती होते. मेम्ब्रेनेस नेफ्रोथॅपी हा ऑटोइम्युन डिसीज आहे. त्यामुळे नेफ्रोटिक सिंड्रोम होतो. हा एक मूत्रपिंड विकार आहे. यामध्ये मूत्रात अधिक प्रमाणात प्रथिने उत्सर्जित केली जातात. किडनी इंटरनॅशनल जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

क्रीममध्ये कोणते घटक आहेत ते पाहा
या पद्धतीच्या क्रीम आरोग्याच्या दृष्टीने अधिक हानिकारक आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करताना लोकांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण त्वचेवर ज्या क्रीम लावतो त्यामध्ये कोणते घटक आहेत, याची एकदा नीट माहिती घ्यावी आणि मग वापर करावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.