बांगलादेशची फिरकी मुश्ताक अहमदच्या हाती

पाकिस्तानचा माजी फिरकीवीर मुश्ताक अहमदच्या हाती बांगलादेशच्या टी-20 संघाचे फिरकीचे प्रशिक्षकपद सोपविण्यात आले आहे. मे महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱया मालिकेपूर्वी संघाच्या सराव शिबिरासाठी ते ढाक्यात दाखल होतील. जबाबदारी मिळाल्यानंतर मुश्ताकने बांगलादेश क्रिकेट मंडळाचे आभार मानले आणि ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचेही म्हणाला. मी या भूमिकेची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो आणि मी माझा सर्व अनुभव बांगलादेशी खेळाडूंना देऊ इच्छितो. माझ्या मते हा संघ कोणत्याही संघाला हरवू शकतो. मी बांगलादेशी खेळाडूंचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुश्ताक म्हणाला. मुश्ताक आता रंगना हेराथची जागा घेणार आहे. 2021 पासून हेराथ बांगलादेशी संघाचा प्रशिक्षक होता. मुश्ताक गेल्या 2008 सालापासून विविध संघात प्रशिक्षकाची भूमिका बजावत आलाय. 2008 ते 2014 पर्यंत तो इंग्लिश संघासोबत होता, तर 2014 ते 2016 आणि 2020 ते 2022 साली त्याने पाकिस्तानच्या फिरकीच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.