नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांच्या तावडीतून इराणच्या जहाजाला सोडवलं, 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका

हिंदुस्थानी नौदलाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. Indian Navy ने अरबी समुद्रामध्ये मोठी कारवाई करत इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून सोडवले आहे. या जहाजावर 23 पाकिस्तानी नागरिक होते. त्यांचीही सुटका करण्यात आली आहे. जवळपास 12 तास हे ऑपरेशन सुरू होते..

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे ‘अल कंबर 786’ नावाचे मासेमारी करणाऱ्या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. या जहाजावर चालक-वाहक दलासह 23 पाकिस्तानी नागरिकही होते. त्यांना वाचवण्यासाठी नौदलाने एक ऑपरेशन सुरू केले. यासाठी ‘आयएनएस सुमेध’ आणि ‘आयएनएस त्रिशूल’ या युद्धनौका अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने वळवण्यात आल्या.

अपहरण झालेल्या जहाजाला गुरुवारी स्थानबद्ध करण्यात आले. ‘आयएनएस सुमेध’नेही कामगिरी फत्ते केली. त्यानंतर ‘आयएनएस त्रिशूल’ही या ऑपरेशनमध्ये सक्रिय झाले. जहाजावर सशस्त्र समुद्री चाचेही होते. या चाच्यांचा बंदोबस्त करत हिंदुस्थानी नौदलाने 12 तासांमध्ये सर्वांची सुटका केली. समुद्री चाच्यांनीही हिंदुस्थानी नौदलापुढे आत्मसमर्पण केले.

दरम्यान, इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अदनची खाडी, लाल समुद्र आणि अरबी समुद्रामार्गे व्यापार करणाऱ्या जहाजांवर हल्ले वाढले आहेत. अनेकदा हिंदुस्थानी नौदलाने यातून जहाजांची सुटका केली आहे. यासाठी हिंदुस्थानने या भागात 10हून अधिक युद्धनौका आणि 5 हजारांहून अधिक जवानही तैनात केलेले आहेत.

आतापर्यंत हिंदुस्थानी नौदलाने या भागात 110 हून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे. यात 45 हिंदुस्थानी आणि 65 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. यात पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश असून 15 लाख टनांहून अधिक सामान समुद्री मार्गे सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.