हुकूमशाही, मुस्कटदाबीच्या वातावरणातील निवडणुकांत हेराफेरी होणारच! जीन ड्रेझ यांची भाजपवर टीका

देशात अलीकडच्या काळात आलेली हुकूमशाहीची लाट आणि सत्ताधारी भाजपकडून विरोधी आवाजांची चाललेली मुस्कटदाबी अशा कठीण कालखंडातून भारतीय लोकशाही सध्या वाट काढते आहे, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध विकासनीती अर्थतज्ञ जीन ड्रेझ यांनी केली आहे. अशा परिस्थितीत होणाऱया लोकसभा निवडणुकांत हेराफेरी होणार, निकाल जवळपास पूर्वनिश्चित असणार हे उघड आहे, असे ते म्हणाले.

पाच वर्षांपूर्वी अरुंधती रॉय यांनी 2019 च्या निवडणुकीचे वर्णन फेरारी आणि काही सायकलींमधील शर्यत असे केले होते. हे रूपक आजही लागू ठरते. आज फेरारीला कॉर्पोरेट क्षेत्राने पाठबळ दिले आहे हे सर्वोच्च न्यायालयामुळे उघड झालेच आहे. त्याचवेळी झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांचे प्रतीक असलेल्या सायकली आणि काँग्रेसला पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे, असे ते म्हणाले.

भाजपला धोका वाटतो अशा प्रत्येक नेत्याचा छळ
या पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय एजन्सींकडून वर्षानुवर्षे अथक छाननी आणि छळ सहन केला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन स्वतः तुरुंगात आहेत. लालूप्रसाद यांनी अधूनमधून तुरुंगवास भोगला आहे आणि राहुल गांधी यांच्यावर आलेली वेळ थोडक्यात टळली आहे. काँग्रेसची खाती गोठवली जात आहेत. भाजपला धोका वाटतो अशा प्रत्येक नेत्याचा छळ सुरू आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये गडबड घोटाळा होणार हे वेगळे सांगायला नको, असे बेल्जियमचे नागरिक असलेल्या ड्रेझ यांनी सांगितले.