आयपीएल तिकिटांची विक्री करणारी टोळी गजाआड 

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून आयपीएल सामन्याच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या टोळीचा दक्षिण सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. खुशल डोबरिया, भार्गव बोराड, उत्तम भिमानी, जास्मिन पिठानी, हिमंत अंताला, निंकूज खिमानी, अरविंद चोटालिया अशी त्यांची नावे आहेत. त्या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे एका कंपनीत काम करतात. गेल्या महिन्यात त्यांच्या पंपनीची बोगस वेबसाईट तयार केली गेली. त्या पोर्टलवरून आयपीएल सामन्याची तिकीट बुकिंग होत असल्याचे भासवण्यात आले. क्रिकेटच्या सामन्याची बनावट तिकीट बनवून त्याची विक्री केली जात होती, याची माहिती कंपनीला मिळाली. हा प्रकार लक्षात येताच पंपनीने दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

सायबर सेल आणि गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सुरत येथून खुशलला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अन्य 6 जणांची नावे समोर आली. त्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. उत्तमने ती बनावट वेबसाईट तयार केली होती. तसेच बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून बँक खाते उघडले होते. त्या खात्यात तिकीट विक्रीचे पैसे येत होते. खात्यात आलेली ती रक्कम ते एटीएम कार्डच्या माध्यमातून काढून घेत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.