निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला दणका, इकबाल सिंह चहल यांना आयुक्तपदावरून हटवले

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका दिला आहे. आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना महापालिकेच्या आयुक्तपदावरून हटविण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर इक्बाल सिंह चहल यांची बदली करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या देखील बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला तरी त्यांची बदली झाली नव्हती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांचे गृहसचिव हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच पश्चिम बंगालच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनाही हटवण्याचे आदेश दिले आहेत.