आणखी एका युद्धाचा भडका, इराणचा इस्रायलवर हल्ला

रशिया-युक्रेन, हमास-इस्रायल यांच्यात युद्ध सुरूच असताना आणखी एका युद्धाची ठिणगी पडली आहे. सीरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून आज भल्या पहाटे इराणने इस्रायलवर हवाई हल्ला चढवला. तब्बल 150 क्षेपणास्त्रांचा मारा करतानाच स्पह्टकांसह 170 ड्रोन इराणने इस्रायलवर सोडले. हा हल्ला इस्रायलने परतवून लावला असला तरी भीतीमुळे चेंगराचेंगरी होऊन त्यात 12 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास पुढचे पाऊल यापेक्षा विध्वंसक असेल अशी धमकीच इराणने दिली आहे. त्यामुळे स्थिती स्पह्टक बनली असून हिंदुस्थानने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

इराणच्या हवाई हल्ल्याला तोंड देण्यासाठी इस्रायलने आपली हवाई हद्द सर्व उड्डाणांसाठी बंद केली असून, अनेक देशांनी आपली उड्डाणे रद्द केली आहेत अथवा इस्रायल वा इराणच्या हवाई क्षेत्रावरून जाण्यापेक्षा अन्य मार्ग निवडले आहेत.

इराणने 170 ड्रोन, 30 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रs आणि 120 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs डागली. यातील बहुतांश ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा इस्रायलच्या हवाई हल्ला संरक्षण प्रणालीने हवेतच वेध घेतला. काही क्रुझ क्षेपणास्त्रs लढाऊ विमानांनी पाडली. तरीही, विशिष्ट लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आलेली अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs इस्रायलच्या हद्दीत पोहोचली. यातील काहींच्या अचूक लक्ष्यवेधामुळे हवाई तळाचे किरकोळ नुकसान झाले आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये अनेक शहरांत हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजत होते आणि काही भागांत स्पह्टांचे धडाके ऐकू आले. या हल्ल्यात काही जण जखमीही झाले आहेत.

अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांकडून निषेध

अमेरिका, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. बेपर्वाई अशी या हल्ल्याची ब्रिटनने संभावना केली आहे. इराण आणि त्याच्या आश्रित संघटनांनी हा संघर्ष त्वरित थांबवावा असे जर्मनीने म्हटले असून, फ्रान्सने, इराण संभाव्य लष्करी संघर्ष वाढीचा धोका पत्करत आहे, असे म्हटले आहे.़

संयम राखा, हिंदुस्थानचे आवाहन

मोठय़ा युद्धाच्या वळणावर पोहोचलेल्या इराण-इस्रायलमधील नवा संघर्ष चिंताजनक असल्याचे हिंदुस्थानने म्हटले असून, उभय देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांशी हिंदुस्थानचे चांगले राजनैतिक संबंध आहेत. यामुळेच, संवाद आणि मुत्सद्देगिरीने हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, असे सांगत परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांशी असलेल्या महत्त्वपूर्ण राजनैतिक संबंधांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आणणाऱया शत्रुत्वाच्या वाढीबद्दल हिंदुस्थान चिंतित आहे. संघर्षमय परिस्थितीपासून तत्काळ माघारी येणे, संयम बाळगणे, हिंसाचारापासून माघार घेणे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने काsंडी सोडवण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे केले आहे.

ठिणगी कशामुळे पडली?

1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावासाजवळ हवाई हल्ला केला होता. त्यात इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह 13 जण मारले गेले होते. त्यानंतर इराणने बदला घेण्याचा इशारा दिला होता.

इराणचा संयुक्त राष्ट्रांनाही इशारा

‘‘जर इस्रायलने इराणविरोधात आणखी कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली तर आता त्याला आमचे उत्तर अधिक विध्वंसक असेल, असे पत्रच इराणने संयुक्त राष्ट्रांना पाठवले आहे. इराणने केलेला हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या कलम 51 मध्ये नमूद केलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत केला आहे. 1 एप्रिल 2024 रोजी इस्रायलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला. इस्रायलच्या या अशा आक्रमक धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी इराणने प्रतिहल्ला केला’’, असे इराणने म्हटले आहे. इस्त्रायलला रोखण्यात सुरक्षा परिषदेला अपयश आल्याचा ठपकाही इराणने ठेवला आहे.

अमेरिका मदतीला धावली

– इस्रायल आपल्या भूमीच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व करेल. हा संघर्ष अद्याप संपलेला नाही, असे इस्रायली लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले आहे. जवळपास डझनभर लढाऊ विमाने आज इस्रायलच्या हवाई हद्दीत घिरटय़ा घालत होती.

– अमेरिकेने हा हल्ला परतवण्यासाठी इस्रायलला मदत केली, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. इराण, इराक, सीरिया आणि येमेनमधून इस्रायलकडे निघालेली अनेक क्षेपणास्त्रs आणि ड्रोन अमेरिकेने रोखल्याची माहिती संरक्षण सचिव लॉयड ऑस्टीन यांनीही दिली.

हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन जारी

इस्रायलमधील हिंदुस्थानी दूतावासाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. इस्रायलमधील हिंदुस्थानी नागरिकांनी सुरक्षेबाबत असलेल्या प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावे. आपल्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. सर्व स्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे, असे नमूद करतानाच एक हेल्पलाईन व ई-मेल आयडीही जारी करण्यात आला आहे.

उड्डाणे थांबवणार

इराण-इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील विमान पंपन्या या दोन्ही देशांत जाणारी विमानसेवा थांबवण्याच्या विचारात आहेत. एअर इंडिया आणि विस्तारा या दोन प्रमुख पंपन्यांनी इराणची हवाई हद्द न वापरण्याची घोषणा केली.