जात पंचायतीमध्ये पीडित कुटुंबाला मारहाण

जात पंचायतीला कायद्याने बंदी असतानाही तालुक्यातील मढी येथे एका समाजाने जातपंचायत भरवली. या जातपंचायतीमध्ये न्यायनिवाडा करताना प्रेम विवाह केलेल्या एका मुलीला पंचांनीच मारहाण करण्याची घटना तारीख एक रोजी घडली आहे.

या घटनेत मारहाण झालेल्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण सहा आरोपी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी कि या घटनेतील फिर्यादी युवती कान्हेश्वरी लक्ष्मण दासरजोगी (वय 20 रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर) हिने प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहावर निवाडा करण्यासाठी मढी येथे जातपंचायती चे आयोजन करण्यात आले होते.

या जातपंचायती मध्ये फिर्यादी मुलीचे वडील लक्ष्मण व आई चंदा, भाऊ सुमित दासरजोगी हे उपस्थित होते तर पंच म्हणून जात पंचायत प्रमुख चंदर बापु दासरजोगी,लक्ष्मण चंदर दासरजोगी, तात्या चंदर दासरजोगी, ताया मल्लु दासरजोगी, रोहित ताया दासरजोगी, काशीनाथ आंबादास दासरजोगी (सर्वे रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपुर जि. अ.नगर) हे उपस्थित होते.

या वेळी सर्व पंचांनी मुलीच्या आई वडिलांना तुमच्या मुलीने जो प्रेमविवाह केला आहे तो आपल्या समाजाला मान्य नसून तुम्ही तो मोडून काढा. आपण या मुलीचा दुसरा विवाह लावून देऊ असे मुलीच्या आई वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीने जो प्रेम विवाह केलेला आहे, तो मुलगा चांगला आहे. त्यामुळे दुसरीकडे लग्न कशाला करायचे असे पंचांना विचारले. पंच लक्ष्मण दासरजोगी व इतरांनी लक्ष्मण यांना काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच पिडीत मुलगी कान्हेश्वरी, तिची आई चंदा यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जर तुम्ही आमचे सांगितलेले ऐकले नाही, तर एका एकाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीच्या शेवटी म्हटले आहे.