लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथल्या पीएमएलए न्यायालयाने आर्म्स अॅक्ट प्रकरणात हे वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने लालू यादव यांना हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, लालू यादव न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

या प्रकरणात लालू यादव यांच्यावर शस्त्र खरेदी करण्याचा आणि ती शस्त्रे विविध ठिकाणी पुरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण 1995 ते 1997 या दरम्यान घडलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर 1998 मध्ये आरोपत्रं दाखल केल होतं. या तीन वर्षांच्या काळात तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून शस्त्र तसंच काडतुसांची खरेदी करण्यात आली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पीएमएलए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती.

या प्रकरणी ग्वाल्हेरचे रहिवासी असलेल्या प्रवेश चतुर्वेदी यांनी 1997मध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत, उत्तर प्रदेशमधील शस्त्र विक्रेता राजकुमार शर्मा याने दोन वर्षांत ग्वाल्हेरमधीलच तीन कंप्यांकडून फसवणुकीने शस्त्रं आणि काडतुसं खरेदी केली आणि ती बिहारमध्ये विकली होती. ही खरेदी लालू यादव आणि त्यांचे वडील कुंद्रीका सिंह यादव यांच्या नावे झाली होती. पण, लालू प्रसाद यादव यांच्या वडिलांचं नाव कुंदन राय असं आहे, मात्र ही बाब पोलिसांनी विचारात घेतली नाही. तसंच, गेल्या बऱ्याच काळापासून लालू यादव आपल्या नावातील प्रसाद हा शब्दही लावत नाहीत, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे लालू यादव यांचं नाव या प्रकरणात आलं.