लातूर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसला

लातूर जिल्ह्यात आज पुन्हा काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधुन मधून हलक्या स्वरुपाचा पाऊस होत होता. लातूर शहर आणि परिसरात दुपारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. औसा तालुक्यातील मौजे उटी बु. परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. तसेच नांदुर्गा परिसरातही जोरदार पाऊस झाला. लातूर तालुक्यातील तांदूळजा परिसरात वादळी वार्‍यासह, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरातही पाऊस झाला.

निलंगा शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते, रिमझिम पाऊस पडला. औराद शहाजनी परिसरात ही ढगाळ वातावरण होते. सुमारे 20 मिनिटे रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. ज्वारी काढणीचा हंगाम असल्याने या पावसामुळे ती काळी पडणार ही चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. देवणी तालुक्यात ढगाळ वातावरण होते. उदगीर तालुक्यातील गुडसूर परिसरात ढगाळ वातावरण होते. मध्येच रिमझिम सरी पडल्या. जळकोट परिसरात संध्याकाळी रिमझिम पाऊस सुरू झाला. अहमदपूर तालुक्यात सायंकाळी रिमझिम पाऊस सुरू झाला. औसा तालुक्यातील किल्लारी येथेही वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी नागोराव बळीराम खंडाळे यांच्या शेतात आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून एक गाय व एक वासरू अशी दोन जनावरे दगावली आहेत.