गडचिरोली-चिमूर मतदारसंघ वार्तापत्र; अटीतटीच्या लढाईत गड कोण सर करणार

>> महेश उपदेव

नक्षलग्रस्तबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱया गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते  विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी सरळ लढत होत आहे. मात्र, अशोक नेते यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये असलेला प्रचंड रोष पाहता ही निवडणूक भाजप उमेदवाराला जड जाणार हे निश्चित! दुसरीकडे डॉ. किरसान यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी पाहता कॉँग्रेसलाही ही निवडणूक फारशी सोपी नसल्याने अटीतटीच्या लढाईत गडचिरोलीचा गड कोण सर करणार याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यात नक्षलवाद्यांचा कोणाला पाठिंबा मिळतो यावर विजयी उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

भाजपचे अशोक नेते हे तिसऱयांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेले नेते यांना याहीवेळी तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. यंदा त्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसू शकतो. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे सरकारी अधिकारी राहिलेले आणि गोंदिया जिह्यातील रहिवासी आहेत. ते मागील काही वर्षांपासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. ते हलबी समजाचे प्रतिनिधित्व करतात. सत्ताविरोधी वातावरणाचा डॉ. किरसान लाभ मिळू शकतो. मात्र, कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले  डॉ. उसेंडी, डॉ. चंदा व नितीन कोडवते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला ही निवडणूक तशी फारशी सोपी नाही.

z अशोक नेते यांच्यासाठी अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर कॉँग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार डॉ. किरसान यांच्यासाठी झटून काम करताना दिसत आहेत. नेते आणि किरसान यांच्या लढाईत आत्राम आणि वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाची खऱया अर्थाने कसोटी लागणार आहे.

बीएसपी, वंचित किती मते घेणार?

काँग्रेस आणि भाजपव्यतिरिक्त बीआरएसपी, वंचित बहुजन आघाडी, बीएसपी आणि अपक्ष उमेदवार किती मते घेणार यावरदेखील विजयाचे गणित अवलंबून आहे. मागील तीन निवडणुकांचा विचार केल्यास वंचित आणि बीएसपी यांना एक लाखाच्यावर मते मिळाली होती, पण यंदा दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार फारसे प्रभावी नसले तरी ते किती मते घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

प्रचारासाठी दमछाक

भाजप आणि कॉँग्रेसमधील नाटय़मय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी नेते आणि डॉ. किरसान यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली. यामुळे प्रचारासाठी दोन्ही उमेदवारांना कमी कालावधी मिळालेला आहे. तीन जिह्यांत विभागलेल्या पाचशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात उमेदवाराचा प्रचार करताना राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

नक्षलवाद्यांचा बहिष्कार झुगारून मतदान?

नक्षलवाद्यांनी पत्रक काढून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा फतवा काढला आहे. हा फतवा झुगारून किती लोक मतदानात सहभागी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भामरागड, एटापल्ली, धानोरा, ंिसरोचा, अहेरी या भागात नक्षलवाद्यांची दहशत असल्यामुळे दुर्गम भागातील मतदारांना मतदान पेंद्रापर्यंत पोहोचविणे हे एक आव्हान आहे