देवेंद्र फडणवीस फोडाफोडीत गुंतल्याने त्यांना गृहखात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही; जयंत पाटील यांनी लगावला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत राज्याच्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना गृहखाते पाहण्यास वेळ नाही, असाही टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत आणि रामाचा आदर्श सांगणारे सीता माईंचं रक्षण म्हणजेच राज्यांतल्या महिलाचं रक्षण का करत नाहीत असाही सवालही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात 8 हजारांहून अधिक दंगली झाल्या. बिहारमध्ये 4 हजार दंगली झाल्या. आपल्याकडे दंगली घडवण्याचा विक्रम झाला. रामनवमीला हल्ली दंगली होतात, दसऱ्याला काहीही होऊ शकते. कोल्हापुरात कुठून माणसे आली माहीत नाही पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले. गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, फक्त पक्ष फोडाफोडी चालली आहे. मला वाटते आता त्यांनी जाहीर करावे की सगळेच एका पक्षात आहेत म्हणजे शांतता प्रस्थापित होईल, असा टोलाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

मुंबई पोलिसांची तुलना एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी होत असे. आता ते दिवस गेले, मी भाषणे ऐकली आहेत. विरोधी पक्षनेत्यांनीही तेव्हा हा उल्लेख केला आहे. न्यायाची व्यवस्था काय आहे? देशात पाच कोटी खटले प्रलंबित आहेत. 10 लाख माणसांमागे 12 न्यायाधीश आहेत. महाराष्ट्रात 50 लाख केसेस पेडिंग आहेत. मला आठवते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2014 लाही गृहखाते होते. रेट ऑफ कनव्हिक्शन जास्त आहे वगैरे सांगायचे. आता केंद्राने एक अहवाल जाहीर केला आहे. त्यात या सरकारमध्ये कनव्हिक्शनचा रेट कमी आहे. गुन्हेगारांना पकडण्यात हे सरकार कमी पडते आहे. मी फडतूस नाही काडतूस आहे असे फडणवीस म्हणाले होते. अहो पण नागपूरमध्ये चोर लुटारुंनी हैदोस घातला आहे. नागपुरात रोज सरासरी तीन ठिकाणी घरफोड्या होत आहेत. हे सगळे सांगतो अशासाठी की नागपूरमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणत वाढली आहे. म्हणून आम्ही सांगतो की महाराष्ट्रात इतर ठिकाणी फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसले पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या उपराजधानीतले वातावरण दुरुस्त करावे, अशी आमची सूचना आहे असंही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांची परिस्थितीही चांगली नाही. मागच्या वर्षात 2 हजारांहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे. यांचं राज्य राहिलं तर तो पहिल्या क्रमांकावर आहे. खुनाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. जळगावचे नाव काढले की बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात, त्यांना अधिकार द्या बघा ते जळगाव स्वच्छ करतील. याला कारणीभूत कोण आहे? महिलांची सुरक्षा यांच्या काळात धोक्यात आहे हे सांगणे आवश्यक आहे. आपण प्रगतीशील राज्य आहोत. या राज्यात बेकारी 10 टक्क्यांच्या वर आहे. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. हे सरकार महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी कमी पडते आहे. पोलीस खात्यात पोलीस भरती का टाळली जाते आहे? हे देखील आम्हाला समजत नाही असंही जयंत पाटील म्हणाले. हे सरकार आता पोलीसही कंत्राटी पद्धतीने करायची आहे का? जागा रिक्त ठेवायच्या आणि कंत्राटी पद्धत आणायची असा यांचा प्रयत्न दिसतो. 2014 ला आम्ही टीव्हीवर पाहिलं एक भगिनी टीव्हीवर यायची आणि म्हणायची कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? आता त्या ताईंना आम्ही शोधतो आहोत. आता कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र हे लोक विचारु लागले आहेत.

ड्रग्जचा विषय म्हणजे उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करण्याची तयारी सुरु झाली आहे. हप्ते सुरु असल्याने ड्रग्ज प्रकरणात काही कारवाई होत नाही. सगळीकडे सर्रासपण सुरु आहे. ललित पाटील सारख्या ड्रग माफियांना राजाश्रय दिला जातो आहे. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं आहे. पुण्यात एक कोयता गँग होती. त्या गँगचा बंदोबस्त हे सरकार करु शकलं नाही. सायबर क्राईम हे प्रचंड मोठं संकट आपल्यावर आहे. डीपफेक आणि इतर प्रकार आपण पाहिले आहेत. फार मोठ्या प्रमाणावर सायबर क्राईम वाढतो आहे. या घटनेला तोंड देताना ऑनलाइन फ्रॉड तर होत आहेतच. सरकारने सायबर क्राईमची व्यवस्था केलेली नाही. महिलेला अश्लील बोललं, अश्लील फोटो टाकले तरीही कारवाई होत नाही. त्यासाठी कठोर कायदे आणले पाहिजेत. मात्र यात सरकारचं अपयश दिसतं आहे. महाराष्ट्र सायबर क्राईमचं कॅपिटल होतोय का? याचा अभ्यास सरकारने केला पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले.

सध्या देशात पहिल्यांदाच राम अवतरतोय असे वातावरण सुरु झाले आहे. पण मी हे सांगू इच्छितो की ही रामाचीच भूमी आहे. अयोध्येला रामजन्म झाला असला तरीही महाराष्ट्रात रामाचे वास्तव्य होते. रामाचा आदर्श सांगत आहात तर मग सीतेचं रक्षण कोण करणार? त्याचीही गरज आहेच. सीतेचे संरक्षण म्हणजे महिलांचे संरक्षण करा मग राम मंदिरात आम्हीही तुमच्या बरोबर येऊ असंही जयंत पाटील म्हणाले.