…तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत फूट पडणार? अजित पवार गटातील नेत्याचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असून आता आघाडीकडून प्रचारालाही सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचे गाडे जागावाटपातच रुतले आहे. अजूनही तीन-चार जागांबाबत महायुतीत रस्सीखेच आणि संघर्ष सुरू आहे. अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संघर्षाचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यातच आता अजित पवार गटातील एका नेत्याने महायुतीच्या भवितव्याबाबत वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. तोपर्यंत महायुती टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे वक्तव्य करत अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. तसेच त्यांनी या वक्तव्यातून विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती टिकेल की नाही अशी शंका व्यक्त केल्याने खळबळ उडवली आहे. त्यांनी हे वक्तव्य मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर केल्याने याची चर्चा होत आहे. तसेच मला ढकलून देण्याचे नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवलाय, असे म्हणत महायुतीतील सहकारी पक्षांनाही इशारा दिला आहे.

माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगले आहे, ते पुढच्या पंचवीस वर्षात कोणाला अनुभवता येणार नाही. गेल्या पाच वर्षातील फोडाफोडीचे राजकारण आपल्याला पटलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान शेळकेंनी महायुतीबाबत असे वक्तव्य केल्याने महायुतीत सर्व आलबेल नाही, याचेच संकेत मिळाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती टिकणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

महायुतीचा धर्म हा फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाळावा, असे नाही. शिंदे गट आणि भाजप यांनीही युतीचा धर्म पाळला पाहिजे. हा धर्म पाळत असताना वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केले पाहिजे, असेही शेळके म्हणाले. आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत खटके उडत आहेत. त्यातच शेळके यांच्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती टिकेल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.